सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील सार्वत्रिक निवडणूक होणार्या ७० पैकी ४ ग्रामपंचायतींतील सदस्य बिनविरोध निवडून आले असून उर्वरित ६६ ग्रामपंचायतींसाठी १ सहस्र ९० उमेदवार रिंगणात राहिले आहेत. ४ जानेवारी या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी ३४१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे बहुतांश ठिकाणी दुरंगी, तर निवडक ठिकाणी तिरंगी लढती होणार, असे सध्याचे चित्र आहे. ही निवडणूक प्रामुख्याने महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, अशी होणार असली, तरी शिवसेना आणि भाजप पुरस्कृत उमेदवारांमध्येच थेट लढती होणार आहेत.
जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींच्या ६०२ जागांसाठी १ सहस्र ५५० उमेदवारी अर्ज आले होते. त्यांपैकी वैभववाडी तालुक्यातील मांगवली आणि कणकवली तालुक्यांतील गांधीनगर या २ ग्रामपंचायतींतील सदस्य यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते, तर ४ जानेवारीला निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या दिवशी देवगड तालुक्यातील रहाटेश्वर आणि मोंडपार या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. कणकवली तालुक्यातील भिरवंडे या बहुचर्चित ग्रामपंचायतीच्या ४ जागांवर बिनविरोध निवड झाली आहे. वैभववाडी तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींपैकी मांगवली ग्रामपंचायतीत यापूर्वीच बिनविरोध निवड झाली असून उर्वरित १२ ग्रामपंचायतींच्या ३३ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. या ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी या दिवशी मतदान होणार असून १८ जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहे.
निवडणुकीत अनुचित प्रकार टाळण्यासाठी काही ठिकाणी पोलीस तैनात !
जिल्ह्यात होणार्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. या निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि निवडणूक प्रक्रिया शांततेत व्हावी, यासाठी पोलीस प्रशासनाने नियोजन केले आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात आचरा, मळगाव आदी निवडणूक असणार्या काही गावांत पोलिसांच्या पथकाने संचलन केले. यामध्ये स्थानिक पोलिसांसह दंगल नियंत्रण पथकही सहभागी झाले होते. (ग्रामपंचायत निवडणुकीसाठीही दंगल नियंत्रण पथक तैनात करणे आणि पोलिसांनी संचलन करणे, या गोष्टी कराव्या लागणारी निरर्थक लोकशाही ! – संपादक)