देशभरातील पुरोगामी संघटनांची संयुक्त शिखर समिती स्थापन

डॉ. गणेश देवी

सांगली – पुरोगामी चळवळीत काम करणार्‍या विविध संघटनांची ‘जिल्हा सेवा समिती’ नावाने शिखर संघटना स्थापन करण्यात आली आहे. राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांच्या उपस्थितीत सांगलीतील कार्यकर्ता बैठकीत हा निर्णय झाला. १७८ जिल्ह्यांमध्ये ४ मासांत शाखा स्थापना केल्या जातील. बैठकीला डॉ. बाबुराव गुरव, व्ही.वाय. पाटील, सुभाष पाटील, विजयकुमार जोखे, गौतमीपुत्र कांबळे, मुनीर मुल्ला, तोहीद शेख आदी उपस्थित होते.

डॉ. देवी पत्रकार बैठकीत म्हणाले की, डाव्या विचारसरणीचे पक्ष समितीमध्ये सहभागी असतील. राजकीय पक्षांनाही झेंडे मागे ठेवून प्रवेश असेल. देशात सध्या संघराज्याच्या उद्दिष्टाला धक्का पोचवणारी कृत्ये सत्ताधारी पक्ष करत आहेत. त्याला एकगठ्ठा ताकदीने विरोधाचे काम समिती करेल. (डाव्या आणि पुरोगामी संघटना यांनी आजपर्यंत केवळ हिंदुत्वनिष्ठ, हिंदु विचारसरणी यांना विरोध करण्याचेच काम केले आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात या संघटनांनी कधी अशी समिती स्थापन का केली नाही ? त्यामुळे ‘अराजकीय’ या गोंडस नावाखाली केंद्रातील सत्ताधारी हिंदुत्वाला जे पूरक निर्णय घेत आहेत त्यांना विरोध करणे हाच यांचा ‘छुपा’ कार्यक्रम असल्याचे सामान्य नागरिकांना लक्षात आल्याविना रहाणार नाही ! काँग्रेसने देशावर खोटा सर्वधर्मसमभाव लादून घटनेच्या उद्दिष्टाला हरताळ फासला, तेव्हा कधी या संघटनांना काही कृती का करावीशी वाटली नाही ? – संपादक)

यातील पहिली समिती सांगलीत १ जानेवारी या दिवशी स्थापन करण्यात आली. नव्या केंद्रीय कायद्यांना समितीचा कडाडून विरोध असेल, असे घोषित करण्यात आले. (नव्या कायद्यांमुळे शेतकर्‍यांना लाभ होणार, असे सकृतदर्शनी दिसत असतांना केवळ भाजपला विरोध म्हणून या कायद्यांना विरोध केला जात आहे, हे सामान्यांच्या लक्षात येईल. – संपादक)