सत्तरी तालुक्यात राममंदिर निधी समर्पण अभियानाला प्रारंभ

प्रस्तावित राममंदिर

वाळपई, ३० डिसेंबर (वार्ता.) – अयोध्येत मोठ्या प्रमाणात राममंदिराची उभारणी होणार आहे. या संदर्भातील बैठका गोव्यात चालू झाल्या आहेत. याविषयीची एक महत्त्वाची बैठक सत्तरी तालुक्यात नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत राममंदिरासाठी निधी समर्पण अभियानावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सत्तरी तालुका कार्यालय वेळूस येथील प्रकाश गाडगीळ यांच्या निवासस्थानी या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उद्घाटक म्हणून सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक आमशेकर हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते या अभियानाचे रितसर उद्घाटन करण्यात आले. या वेळी श्री राममंदिर निधी समर्पण सत्तरी तालुकाप्रमुख तुळशीदास काणेकर, कार्यालय प्रमुख प्रकाश गाडगीळ, माजी आमदार नरहरि हळदणकर, कारसेवक म्हाळू गावस, शंकर गावकर हे उपस्थित होते.

याप्रसंगी प्रकाश गाडगीळ म्हणाले, ‘‘कारसेवकांनी सत्तरीतील प्रत्येक घरात प्रत्यक्ष भेट देऊन राममंदिराची संकल्पना पूर्णत्वास यावी यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यावर भर दिला होता. आज खर्‍या अर्थाने प्रत्येक रामभक्ताचे स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे. येणार्‍या काळात राममंदिराची भव्य उभारणी होणार आहे. हा दृष्टीकोन समोर ठेवून सत्तरी तालुक्यामध्ये हे अभियान राबवण्याविषयी प्रत्येकाने सहयोग द्यावा.’’