कोरोनाविषयीचे नियम पाळून साजरा होणार महोत्सव
कणकवली – असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेले परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४३ वा पुण्यतिथी महोत्सव १७ ते २१ डिसेंबर या कालावधीत कोरोनाविषयीचे नियम पाळून अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या कालावधीत सर्व धार्मिक विधी केले जाणार आहेत; मात्र महाप्रसाद, तसेच व्यासपिठावरील सांस्कृतिक कार्यक्रम रहित करण्यात आले आहेत.
१७ ते २० डिसेंबर या कालावधीत पहाटे ५.३० ते ७.३० या वेळेत समाधीपूजन, काकड आरती, सकाळी ८.३० ते १२.३० सर्व भक्तकल्याणार्थ धार्मिक विधी, भालचंद्र महारूद्र महाअभिषेक अनुष्ठान, दुपारी १२.३० ते १ आरती, १ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत भजन मंडळांची भजने, सायंकाळी ७ वाजता धुपारती, रात्री ८ वाजता दैनंदिन आरती होणार आहे.
२१ डिसेंबर या परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ४३ व्या पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्यदिनी पहाटे ५.३० वाजता समाधीपूजन, काकड आरती, सकाळी ८ वाजता भजने, १०.३० वाजता समाधीस्थानी श्रींची राजोपचार महापूजा, दुपारी १२.३० ते १ आरती, १ ते ५ भजने, सायंकाळी ५ वाजता संस्थान परिसरात भाविकांच्या मर्यादित उपस्थितीत परमहंस भालचंद्र महाराज यांची पालखी मिरवणूक, रात्री ८ वाजता दैनंदिन आरती आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी महोत्सवास येणार्या भाविकांनी शासकीय नियम आणि शिस्त पाळणे आवश्यक आहे. संस्थान परिसरात आणि समाधीस्थानी मास्क लावणे, शारीरिक अंतर ठेवून दर्शन घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे भाविकांनी गर्दी टाळावी, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत यांनी केले आहे.