|
पोलीस आयुक्तांनी या गंभीर आरोपांची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा आहे !
मुंबई, २९ नोव्हेंबर (वार्ता.) – रायगड जिल्ह्यातील तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण हिंदूंना सण साजरे करू देण्यास अडवणूक करून मुसलमानांच्या सणांना मात्र अनुमती देत आहेत, तसेच धर्मांधांच्या विरोधात केलेल्या तक्रारीवरून हिंदुत्वनिष्ठांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी देत आहेत, असा गंभीर आरोप विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी केला आहे. याविषयी २३ नोव्हेंबर या दिवशी या संघटनेच्या वतीने नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांचे पदाधिकारी पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत.
याविषयी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
१. तळोजा पाचनंद फेज १ येथील नवीन वसाहतीमधील वाहनतळाच्या जागेत अफरोज शेख नावाच्या धर्मांधाने अनधिकृत मशीद चालू केली आहे.
ही व्यक्ती देशविघातक कृत्ये करत असल्याचे निदर्शनास आले आहे. याविषयी पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांच्याकडे तोंडी तक्रार केली; मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले.
२. या प्रकरणात काशिनाथ चव्हाण यांनी अफरोज शेख याच्याशी संगनमत करून आमच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ केली, तसेच गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली.
३. काशिनाथ चव्हाण यांनी तळोजा येथील पाचनंद फेज १ येथील शिवमंदिराच्या विरोधात सिडकोकडे तक्रार केली. तसेच हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री हरेश केणी आणि गुरुनाथ मुंबईकर यांना पोलीस ठाण्यात बोलावून दमदाटी करून नोटीस दिली.
४. या ठिकाणी नवरात्रोत्सवात देवीची मूर्ती बसवण्याला विरोध केला; मात्र ईद साजरी करण्याला अनुमती दिली आणि त्या ठिकाणी स्वत:ही उपस्थित राहिले. त्या वेळी साथीचे रोगप्रतिबंध कायद्याचा भंग झाला नाही का ?
५. ‘जातीय तेढ निर्माण केली, तर बंदोबस्त करावा लागेल’, अशा प्रकारे काशिनाथ चव्हाण यांनी हिंदुत्वनिष्ठांना वारंवार धमकी दिली.
६. श्री. हरेश केणी यांना २० नोव्हेंबर या दिवशी दूरभाष करून साथीचे रोग प्रतिबंध कायद्याचा भंग झाल्याचा आरोप करून खोटा गुन्हा नोंदवला.
७. वरिष्ठ पोलीस निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांचा उद्दामपणा वाढत राहिला, तर आमच्या संघटनांद्वारे आंदोलन करावे लागेल.