भित्यापाठी ब्रह्मराक्षस !

संपादकीय

कोरोनाला अटकाव करण्यासाठी १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण देशामध्ये दळणवळण बंदी (लॉकडाऊन) लागू करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस लागू केलेल्या दळणवळण बंदीमुळे कोरोनाचे गांभीर्य लक्षात यावे. नागरिकांनी गांभीर्याने वागण्याची आवश्यकता असली, तरी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. गांभीर्य आणि भय यांमधील सीमारेषा ओळखून नागरिकांनी दायित्वाने वर्तन करणे अपेक्षित आहे. याचे कारण असे की, दिवसभर वृत्तवाहिन्यांमधून ‘कोणत्या देशांत किती कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले ?’, ‘किती दगावले ?’, ‘सर्वत्र कसे भयावह वातावरण आहे ?’, ‘या परिस्थितीचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होत  आहे ?’, आदी ‘ब्रेकिंग’ बातम्या दाखवल्या जातात. प्रसारमाध्यम म्हणून सर्वत्रच्या घडामोडी आणि वस्तूस्थिती मांडणे आवश्यकच आहे; पण याच्या अतीमार्‍यामुळे म्हणा अथवा घरातच अडकून राहिल्याने येणार्‍या एकटेपणामुळे म्हणा अनेकांमध्ये एकप्रकारचे भय निर्माण झाल्याचे दिसून येते. त्यातच कोरोनाची लक्षणे आणि सर्दी, खोकला, ताप यांची लक्षणे एकसारखीच आहेत. त्यामुळे साधा खोकला किंवा शिंक आली की, व्यक्तीमध्ये शंकेची पाल चुकचुकते. ‘कोरोना’ची लागण तर झाली नसावी ना’, ही शंका डोके वर काढते. शंका आल्यास अथवा आजारपण वाटल्यास प्रत्येक व्यक्तीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या करून घेणे आवश्यकच आहे; पण म्हणून प्रत्येक क्षणी भीतीच्या छायेत वावरण्याचेही कारण नाही.

मानवी शरीर ही ईश्‍वराची अनोखी किमया आहे. शरिराची रोगप्रतिकारक क्षमता चांगली असेल, तर शरिरात येणार्‍या अनावश्यक आणि उपद्रवी घटकांचा (फॉरेन बॉडी) शरीर निसर्गतःच प्रतिकार करते. सुदृढ आणि निरोगी शरीर, हीच खरी कमाई आहे; मात्र अयोग्य खाण्याच्या आणि पिण्याच्या अयोग्य सवयींमुळे आज लहान वयातच अनेक जणांना व्याधी जडत असल्याचे दिसून येते; म्हणूनच कोरोनासारखा एक विषाणू संपूर्ण जग हादरवून सोडू शकतो. कोणत्याही रोगाचा सामना करण्यासाठी शरीर सुदृढ असणे आवश्यक आहे, तेवढेच मनही खंबीर असणे आवश्यक आहे. मन जर कमकुवत आणि शंकेखोर असेल, तर साधी शिंकही मरणप्राय ठरू शकते.

दिलासादायक घटनाही विचारात घ्या !

कोरोनाचा प्रादुर्भाव जगभर होत असला, तरी कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होण्याच्या घटनाही घडत आहेत. जगभरात वर्षभरात हृदयविकार किंवा हृदयाशी संबंधित आजार यांमुळे होणार्‍या मृत्यूंची संख्या दीड कोटींहून अधिक आहे. वर्षभरात जगभर रस्ते अपघातांत होणार्‍या मृत्यूंची संख्या १२ लाखांहून अधिक आहे. कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत ३-४ मासांत (महिन्यांत) २१ सहस्र २९७ जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या जवळपास पावणेपाच लाख असली, तरी त्यातून बरे झालेल्यांची संख्याही अनुमाने सव्वा लाख आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम सापडलेले कोरोनाग्रस्त रुग्ण दांपत्यही गुढीपाडव्याच्या दिवशी बरे होऊन घरी परतले. तात्पर्य, कोरोनाची साथ विश्‍वव्यापी असली, तरी त्यामुळे गळून जाण्याचे कारण नाही. सरकारच्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन, प्रतिबंधात्मक उपाय, खंबीर मन आणि आत्मबळ हे कोरोनाविरुद्धच्या युद्धातील शस्त्रे आहेत. ती वापरली, तर कोरोनाचा पराभव करणे अशक्य नाही; पण त्यासाठी ‘त्याला काय होते’ ही निष्काळजीपणाची भावना काटेकोरपणे दूर ठेवणे आवश्यक आहे. संचारबंदीनंतरच्या काळात रस्त्यांवर नागरिकांनी केलेली गर्दी पहाता ‘नागरिक’ म्हणून स्वयंशिस्तीचा किती मोठा पल्ला अजून गाठायचा आहे, हे लक्षात येते.

इंग्रजीत ‘Prevention is better than cure’ अशी एक म्हण आहे. याचा अर्थ संकट आल्यावर त्याच्याशी दोन हात करण्यापेक्षा ते येऊच नये, यासाठी उपाययोजना करणे शहाणपणाचे असते. अनेक द्रष्ट्या संतांनी आगामी काळात रोगराई, भूकंप, पूर अशा आपत्ती, तसेच आपत्काळ येणार असल्याचे भाकीत वर्तवले आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रात आलेला महापूर, आताची कोरोनाची साथ, मंदी आदी संकटे ही आपत्काळाचीच लक्षणे आहेत. तहान लागल्यावर विहीर खणून उपयोगाचे नसते. गंभीर आजारी झाल्यावर व्यायाम केल्याने तितकेसे काही साध्य होत नाही, तर आजार होऊच नये; म्हणून केलेला व्यायाम लाभदायी ठरतो. हे लक्षात घेऊन किमान पुढच्या गंभीर आपत्काळात तरून जाण्यासाठी आतापासून शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तसे करणे, हा खरा पुरुषार्थ आहे. कोरोनाच्या निमित्ताने आतापर्यंतच्या चुकीच्या सवयी, विचार आणि जीवनशैली यांमध्ये योग्य तो पालट करण्याचा निश्‍चय अनेक जणांनी केला असेल. तो कृतीत आणणे, आवश्यक आहे. निश्‍चयाला कृतीची जोड नसेल, तर त्याचा तितकासा उपयोग नसतो. सरकार आणि समाज संघटितपणे कोरोनाचा यशस्वीरित्या प्रतिकार करतील; पण त्यानंतर सुधारणा न करता ‘पहिले पाढे पंचावन्न’प्रमाणे वागणे, हे आत्मघाताचे ठरेल.

निर्भय हो मना रे !

कोणत्याही आपत्तीनिवारणामध्ये ‘समुपदेशन’ हाही एक महत्त्वाचा घटक असतो. संकटामुळे भयभीत झालेल्या समाजाला आधाराची आवश्यकता असते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लोकांना आधार देण्यासाठी काही ठिकाणी समुपदेशन गटांनीही पुढाकार घेतला आहे. घरात राहून, कुटुंबापासून वेगळे राहून आणि कोरोनाच्या लक्षणांना घाबरून येणारी मानसिक भीती आणि ताण दूर करण्यासाठी हे समुपदेशक प्रयत्नरत आहेत. हे मनोबल वाढवण्यासाठी आत्मबळ चांगले असणे आवश्यक आहे. हे आत्मबळ साधनेनेच प्राप्त होते. साधनेमुळेच मन निर्भय होते. बाह्यपरिस्थितीचा मनाच्या स्थिरतेवर परिणाम होत नाही; मात्र ही साधनेची पुंजी तुटपुंजी असेल, तर मात्र ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ !