
लॅटिन अमेरिकेतील ब्राझील देशात ‘सेंट्रो कल्चरल विश्व विद्या’ येथे पहिल्या श्री गणेशाच्या मूर्तीची नुकतीच प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. साधारणपणे ४ फूट उंचीची ही पाषाणमूर्ती अत्यंत विलोभनीय आणि भारताच्या संस्कृतीची मुळे घट्ट करणारी ठरली आहे. वेदमंत्रांच्या उच्चारात अभिषेक करून हा सोहळा पार पडला. त्याला भारताचे स्थानिक राजदूत उपस्थित होते. पद्मश्री आचार्य जोनास मसेट्टी यांना ‘पद्मश्री’ हा पुरस्कारच त्यांनी विदेशात वैदिक संस्कृती, म्हणजेच हिंदु संस्कृतीच्या प्रचारासाठी केंद्रशासनाने दिला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा मंगलमय सोहळा तेथे पार पडला. विघ्नांचे हरण करणारी देवता, म्हणजे श्री गणेश ! गणरायाच्या आगमनाने तेथील हिंदु समाजाला आनंद झाला नाही, तर नवल ! अनेक हिंदूंनी या सोहळ्याचे कौतुक केले आणि ‘यामुळे लॅटिन अमेरिकेतील ब्राझील अन् आसपासच्या देशांमध्ये हिंदु संस्कृतीचा प्रसार होईल, तसेच हिंदु धर्माची महती पुन्हा समाजावर बिंबेल’, अशी अपेक्षा व्यक्त केली. लॅटिन अमेरिकेतील अनेक देशांमध्ये हिंदु संस्कृतीच्या पाऊलखुणा अजूनही सापडतात. ‘मूलत: या देशांमध्ये हिंदु धर्म आणि संस्कृती येथे पूर्वी वास करत होती’, असे तेथील हिंदु सांगतात. गयाना देशात हिंदु संस्कृतीचे पालन करणारे लोक सर्वाधिक आहेत. त्या खालोखाल सुरीनाम देशात आहेत आणि कॅरेबियन बेटांपैकी त्रिनिदाद अन् टोबॅगो येथे अधिक संख्येत हिंदु लोक असून ते सण-उत्सव अत्यंत उत्साहात साजरे करतात. गयाना येथे तर भव्य हिंदु मंदिरे असून तेथे दिवाळी आणि होळी या सणांना सुटी असते. रामायण आणि भगवद्गीता या ग्रंथांचे घराघरात वाचन होते. सुरीनाममधील धार्मिक विधी भारतीय संस्कृतीला धरूनच असतात. तेथील सरनामी भाषा ही भोजपुरी आणि अवधी भाषांवर आधारित आहे.
हिंदु संस्कृतीचे अस्तित्व
भारताचा सध्याचा प्रदेश हा खंडित आहे, म्हणजेच अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार आदी देश हे अखंड भारताचाच भाग होते. त्यामुळे हिंदु संस्कृतीशी संबंधित खुणा तेथे आहेत. त्याचप्रमाणे मलेशिया, इंडोनेशिया, कंबोडिया आदी देशांमध्ये जे मुसलमान बहुसंख्य झाले आहेत, तेथे तर हिंदु संस्कृतीचे अस्तित्व ठळकपणे मंदिरे, धार्मिक प्रथा-परंपरा आणि सण-उत्सव यांच्या रूपाने आहे. काही देश मुसलमान जरी झाले असले, तरी तेथे रामायणावर आधारित नाटक अन् रामायणातील शिल्पे आजही आहेत, म्हणजे ते धर्मांतरित झाले असले, तरी त्यांची हिंदु संस्कृतीशी नाळ तुटलेली नाही. हाच भाग अमेरिकेसारख्या महाकाय खंडात मध्य आणि दक्षिण अमेरिकेत काही प्राचीन संस्कृतींच्या अवशेषांच्या संदर्भात लागू आहे. मध्य अमेरिकेत ‘माया’ संस्कृती आणि प्राचीन भारतीय संस्कृती यांमध्ये शून्य, मंदिराची रचना अन् कला-चिन्हे यांच्या संदर्भात विलक्षण साम्य आहे. मेक्सिकोमधील काही शिल्पांमध्ये ‘मकर’ (पौराणिक जलचर प्राणी)सारख्या आकृत्या कोरलेल्या आढळतात. अमेरिकेतील काही उत्खननांमध्ये गणपति आणि मारुति यांसारख्या दिसणार्या मूर्ती सापडल्याचे दावे केले गेले. होन्डुरामध्ये सापडलेल्या ‘लॉस्ट सिटी ऑफ मंकी गॉड’चा संबंध हनुमानाशी जोडला जातो. इंका संस्कृतीत सूर्याची पूजा केली जायची आणि मुख्य देवता सूर्यच होती. इंका समाजातील श्रेणीबद्ध रचना प्राचीन भारतातील वर्णाश्रमव्यवस्थेसारखी होती. अमेरिकेतही सापडलेली ही साम्ये थक्क करणारी असली, तरी आधुनिक इतिहासकार त्यांना ‘समान मानवी उत्क्रांती’ मानतात; मात्र ‘प्राचीन काळात समुद्री मार्गाने भारतियांचा अमेरिकेशी संबंध आला असावा’, असा एक गट मानतो. याचाच अर्थ कुणी मानो अथवा न मानो हिंदु संस्कृतीचे अस्तित्व अमेरिकेतही आढळले आहे.

भारतात मात्र उपहास !
भारतातच हिंदु संस्कृती आणि हिंदूंची श्रद्धास्थाने यांचे अवमूल्यन व्हावे, त्यांचा अवमान व्हावा, त्यांच्याविषयी घृणा निर्माण व्हावी, यासाठी देशातील साम्यवादी अन् जिहादी मानसिकता असणार्यांनी सरकारी स्तरावर प्रयत्न केला. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर भारतात हिंदूंची स्थिती विदारक होत गेली. हिंदूंच्या नशिबी दुय्यम दर्जाची वागणूक, हिंदूंसाठी एक कायदा आणि मुसलमानांना वेगळा नियम; हिंदूंच्या मिरवणुकांमुळे इतरांना त्रास होतो, त्यामुळे त्या काढण्यावर बंदी, हनुमानचालिसा मोठ्या आवाजात लावण्यावर बंदी, हिंदूंच्या धर्मप्रसारावर प्रतिबंध लावणारे कायदे निर्माण करणे, हिंदुत्वासाठी कार्य करणार्यांना लक्ष्य करून त्यांची हत्या करणे, त्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याचे प्रयत्न करून अस्तित्वात नसलेला ‘हिंदु आतंकवाद’ सिद्ध करण्याचे प्रयत्न करण्यात आले. िहंदु साधूसंतांना कारागृहात डांबण्यात आले. हिंदु काश्मीरची ओळख पुसून ‘जिहाद्यांचे काश्मीर’ अशी करण्यासाठी हिंदूंना वेचून ठार करून आणि हिंदु मंदिरे पाडून प्रयत्न झाले. भारताच्या काही भागांत ‘गझवा-ए-हिंद’, म्हणजे त्या त्या भागांचे इस्लामीकरण करण्याचे प्रयत्न झाले; मात्र अनादी, अनंत अशा तेजस्वी हिंदु धर्मात मूळ शक्तीशाली चैतन्य असल्याने आतापर्यंत जिहादी आणि साम्यवादी यांनी काँग्रेसच्या साहाय्याने केलेले सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. हिंदु धर्म या सर्वांना पुरून उरला. हिंदु धर्म मूळ असलेल्या भारतावर आतापर्यंत ख्रिस्तपूर्व ६ व्या शतकापासून भारत इंग्रजांच्या कह्यातून स्वातंत्र्य होईपर्यंत इराणी, ग्रीक, कुशाण, हुण, अरब, तुर्क, मोगल, मंगोल, पर्शियन, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि इंग्रज यांनी आक्रमणे केली. एवढी भीषण आक्रमणे होऊनही हिंदु संस्कृतीतील प्रखर तेज आणि शक्ती यांमुळे ही सर्व आक्रमणे बाहेरील (कु)संस्कृती भारतावर लादण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.
‘जगात सर्वांत प्राचीन हिंदु धर्म आहे’, असे हिंदु धर्मग्रंथांच्या उत्पत्तीमुळे लक्षात येते. असे जर असेल, तर जगात जेथे जेथे म्हणून मनुष्य रहात होतो, तो आचरण कुठले करणार, हिंदु संस्कृतीचेच ना ? रामायणाचा काळ त्रेतायुगातील, म्हणजे २० लाख वर्षांपूर्वीचा धरला, तर तेव्हा कुठे अन्य संस्कृतींचे संदर्भ आढळतात ? तेव्हा भारतीय संस्कृतीच होती. कोरियन साहित्यानुसार अयोध्येची राणी सुरीरत्ना यांनी समुद्रमार्गे कोरिया येथे जाऊन तेथील राजाशी विवाह केला होता. त्यांचे नाव पालटले होते, तरी आजही तेथील लाखो लोक स्वत:ला या राणीचे वंशज मानतात आणि अयोध्येला म्हणजे राणीच्या माहेरी येऊन श्रद्धांजली वहातात. अमेरिकेतच एक भव्य श्रीयंत्र भूमीवर रेखाटलेले आढळले आहे. जगातील सर्वांत मोठे महाविष्णूचे मंदिर अंकोरवाट हे कंबोडिया देशातच आढळले आहे. याचाच अर्थ प्रत्येक देशातील हिंदु धार्मिक चिन्हे, स्थापत्यकला, वास्तूकला, भाषा, वस्तू, साहित्य यांचा मागोवा घेतला, तर तेथे न्यूनाधिक प्रमाणात हिंदु संस्कृतीच्याच पाऊलखुणा सापडतील. यातून हेसुद्धा स्पष्ट होते की, आता आलेल्या किंवा प्रस्थापित झालेल्या अन्य पंथियांनीच मूळ हिंदु संस्कृतीवर अतिक्रमण करून त्यात शक्य ते पालट करून स्वत:चे भासवण्याचा प्रयत्न केला, तरी त्यात ते यशस्वी झालेले नाहीत. तो दिवस आता दूर नाही की, मानवजातीच्या कल्याणासाठी भारतासह जगभरात हिंदु धर्म आणि संस्कृतीच पुन्हा एकदा प्रस्थापित होणार आहे, हे नक्की !
संपादकीय : सरकारची ऑनलाईन फसवणूक !
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
टेक्सास (अमेरिका) येथे अमेरिकी तरुणाने भारतीय राष्ट्रध्वज फाडला
Trump Tariff : ट्रम्प भारतासह अनेक देशांवर १२.५ टक्के अतिरिक्त आयात शुल्क लादणार
संपादकीय : दैवी स्वरसाज हरपला !
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम, २०२६’: ऐतिहासिक न्यायाचा देखावा कि देवस्थानांच्या लाखो हेक्टर भूमी हडपण्याचा कायदेशीर कट ?