सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि साधक यांच्यात असणारे आध्यात्मिक स्तरावरील अतूट नाते !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सनातन संस्थेची स्थापना केली. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या स्थापनेच्या आधीपासून आणि संस्थेच्या स्थापनेनंतरही सहस्रो साधकांनी साधनेला आरंभ केला. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी एका वेळी वेगवेगळ्या ठिकाणच्या सहस्रो साधकांना त्यांच्या प्रीतीने घडवले आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि साधक यांच्यात एक सुंदर आध्यात्मिक नाते आहे. साधक गुरुदेवांकडे काही मागत नाहीत आणि गुरुदेवही साधकांना काही अल्प पडू देत नाहीत. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी साधकांना भरभरून दिले आहे, देत आहेत आणि येणार्‍या काळात त्यांचे साधकांवरील प्रेम असेच रहाणार आहे. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव आणि साधक यांच्यातील आध्यात्मिक स्तरावरच्या सुंदर नात्याची काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची महानता !

१ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी स्वतःच्या त्रासाकडे साक्षीभावाने पहाणे : ‘वर्ष २००० मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर वाईट शक्तींनी सूक्ष्मातून आक्रमण केले. स्वतःला अतिशय त्रास होऊनही गुरुदेवांनी त्याकडे साक्षीभावाने पाहिले.

१ आ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा मर्मबिंदू म्हणजे साधक आहेत’, हे वाईट शक्तींनी ओळखणे आणि त्यांनी साधकांवर सूक्ष्मातून आक्रमणे करण्यास चालू केल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून प्रत्युत्तर देणे चालू करणे : ‘गुरुदेवांना स्वतःला कितीही त्रास झाला, तरी ते काही करणार नाहीत; मात्र त्यांचा मर्मबिंदु म्हणजे साधक आहेत’, हे वाईट शक्तींनी ओळखले. त्यानंतर वाईट शक्तींनी साधकांवर आक्रमणे चालू केली. त्या वेळी मात्र गुरुदेवांनी त्याकडे साक्षीभावाने पाहिले नाही. त्यांनी वाईट शक्तींना सूक्ष्मातून प्रत्युत्तर देणे चालू केले.

२. साधक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडे ‘माता, पिता, बंधु, सखा’ या रूपांत पहात असणे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या समवेतचा एक क्षणही साधकांसाठी अमूल्य ठेवा असणे 

वर्ष २००८ मध्ये एका साधिकेला कर्करोग झाला होता. त्या वेळी गुरुदेवांची प्रकृती बरी नव्हती. असे असूनही ते त्या साधिकेला भेटण्यासाठी तिच्या घरी गेले, तसेच आश्रमात दोन साधकांचे देहावसान झाल्यावर स्वतः त्या ठिकाणी आले. त्यांनी मृत साधकांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आणि त्यांच्या चितेवर चंदनकाष्ठही ठेवले. इतकेच नाही, तर दोन साधकांना वेगवेगळ्या प्रसंगांत आध्यात्मिक त्रासांमुळे उलटी आल्यावर सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी आपल्या हातांची ओंजळ त्यांच्या पुढे धरली होती. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची साधकांवर असलेली पराकोटीची प्रीती दर्शवणारी ही उदाहरणे आहेत. गुरुदेव स्वतः उच्च आध्यात्मिक पातळीला असूनही ते साधकांसाठी वेळ देतात. साधक गुरुदेवांकडे ‘माता, पिता, बंधु, सखा’ या रूपांत पहातात. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या समवेतचा एक क्षणही साधकांसाठी अमूल्य ठेवा आहे. साधक तो क्षण हृदयात जूपन ठेवतात.

‘जगाच्या पाठीवर कुठेही असणार्‍या साधकासाठी नामजपादी उपाय करून त्याचा त्रास न्यून होईल’, असे आध्यात्मिक स्तरावरील उपाय शोधणे’, ही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना दिलेली अनमोल भेट असणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हळूहळू आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांची संख्या वाढू लागली. त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी या त्रासांच्या संदर्भात विविध प्रकारे संशोधन केले आणि साधक जगाच्या पाठीवर कुठेही असला, तरीही त्याला नामजपादी उपाय करता येतील, अशा आध्यात्मिक स्तरावरील उपायांच्या पद्धती त्यांनी शोधून काढल्या. त्यांनी ‘सूर्यप्रकाशात बसून उपाय करणे, आकाशाकडे पाहून नामजप करणे, मुद्रा आणि न्यास करणे, प्राणशक्ती वहन उपायपद्धतीनुसार नामजप शोधून काढणे, नामजपाचे मंडल करणे, रिकाम्या खोक्याचे उपाय करणे’, असे अनेक आध्यात्मिक उपाय शोधले. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी ‘वास्तूतील त्रास न्यून होण्यासाठीचे उपाय, काळानुसार आवश्यक देवतेचा नामजप’, असे उपायही साधकांना सांगितले आहेत. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी शोधून काढलेले आध्यात्मिक उपाय म्हणजे साधकांसाठी ती अनमोल अशी भेट आहे. साधक ते उपाय करत असल्यामुळे त्यांचे जन्मोजन्मीचे आध्यात्मिक त्रास न्यून होत आहेत.

– सौ. श्रद्धा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.३.२०२६)

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या काळात साधकांची काळजी वाटणे आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना कुठलाही त्रास व्हायला नको’, असे साधकांना वाटणे 

वर्ष २००९ मध्ये सनातन संस्थेसाठी प्रतिकूल काळ होता. सनातन संस्थेवर संभाव्य बंदीचे संकट होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत साधकांना भोजन, निवास या कुठल्याही गोष्टीची काळजी नव्हती; मात्र ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणांपासून क्षणभरही दूर जायला नको’, असे साधकांना रात्रंदिवस वाटत होते. ‘काही झाले, तरी साधना करता येऊ दे, देवापासून अंतर नको’, असेच विचार साधकांच्या मनात होते. या काळातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना साधकांची काळजी वाटत होती आणि ‘गुरुदेवांना कुठल्याही प्रकारचा त्रास व्हायला नको’, असे साधकांना वाटत होते. ‘सापडलो एकामेका, जन्मोजन्मी नोहे सुटका ।’, या प.पू. भक्तराज महाराजांच्या भजनांची आठवण या प्रसंगी होते.

४. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे जीवन अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे जीवन 

वर्ष २००९ मध्ये एका साधिकेला असाध्य आजार झाला होता. तिचे शेवटचे काही दिवस राहिले होते. त्यात ती व्यष्टी साधनेचे प्रयत्न मनापासून करत होती. तिचे प्रयत्न पाहून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना अतिशय आनंद झाला. त्यांनी सांगितले, ‘‘साधक ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्यावर जन्म-मृत्यूंच्या फेर्‍यांतून मुक्त होतो. ती साधिका ५५ टक्के आध्यात्मिक पातळीला जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाली आहे.’’ साधक करत असलेल्या प्रयत्नांवर प्रसन्न होऊन त्यांची अल्प कालावधीत प्रगती करून घेणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले एकमेवाद्वितीय आहेत.

एक संत आश्रमात साधकांसाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय करण्यासाठी आले होते. त्या वेळी एक साधक गुरुदेवांना म्हणाला, ‘‘मला त्या संतांची शक्ती पेलवत नाही.’’ तेव्हा गुरुदेव त्या साधकाला म्हणाले, ‘‘तू त्याची काळजी करू नकोस. ते मी पहातो.’’ ‘साधकांना कोणत्याही गोष्टीचा त्रास होऊ नये’, यांसाठी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव अतिशय काळजी घेतात. ते स्वतःचे व्यष्टी जीवन तत्त्वनिष्ठ श्रीरामाप्रमाणे जगतात, तर साधकांसाठी ते महाभारताच्या युद्धाच्या वेळी पांडवांसाठी सर्व गोष्टीत तडजोड करणार्‍या श्रीकृष्णाप्रमाणे आहेत.

(क्रमश:)

याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1037719.html

– सौ. श्रद्धा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.३.२०२६)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक