NEET Exam Row : ‘नीट’ परीक्षेच्या वेळी तुळशीची माळ घातलेल्या विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला

  • बुरखा घातलेल्या विद्यार्थिनीला मात्र प्रवेश

  • लोकांमध्ये संतापाची लाट

(नीट (NEET) – नॅशनल टॅलंट एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजे राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा)
(बुरखा म्हणजे संपूर्ण शरीर झाकण्याचे वस्त्र)

नवी देहली – काही दिवसांपूर्वी ‘नीट’ परीक्षेच्या वेळी परीक्षा केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांच्या झालेल्या कठोर पडताळणीचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले आहेत. एका व्हिडिओमध्ये बुरखा घालून परीक्षा केंद्रामध्ये पोचलेल्या विद्यार्थिनीला प्रवेश दिल्याचे; मात्र अन्य एका व्हिडिओमध्ये तुळशीची माळ घातलेल्या एका विद्यार्थिनीला माळ काढायला भाग पाडल्याचे दिसून आले. यामुळे समाजामध्ये संतापाची लाट आहे. ‘नीट’ परीक्षा ही विद्यार्थ्यांनी एम्.बी.बी.एस्. आदी वैद्यकीय क्षेत्रांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी घेतली जाते. ३ मे या दिवशी देशभरातील २० लाख ५ सहस्र विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली.

१. पहिला व्हिडिओ राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यातील आहे. यात बुरखा घातलेल्या एका विद्यार्थिनीला केवळ चेहरा ओळखल्यानंतर परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश मिळाला.

२. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांचे म्हणणे आहे की, इतकी कठोर पडताळणी करून कुणाला बुरखा घालून परीक्षा केंद्रांमध्ये प्रवेश करण्याची अनुमती कशी दिली जात आहे ?

३. अन्य एक व्हिडिओ गुजरातच्या सुरतमधील आहे. तेथे एका विद्यार्थिनीला तुळशीची माळ घालून प्रवेश न मिळाल्याने बराच गोंधळ झाला. व्हिडिओमध्ये विद्यार्थिनीच्या वडिलांनी या कडक पडताळणीविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यांनी असेही म्हटले की, आम्ही सुरतमध्ये आहोत, पाकिस्तानात नाही.

४. यानंतर सामाजिक माध्यमांवर चर्चा चालू झाली की, एका बाजूला इतकी कडक पडताळणी होते की, हिंदु विद्यार्थी वापरत असलेल्या हिंदु धर्माच्या प्रतीकांनाही सोडले जात नाही. दुसरीकडे मात्र मुसलमान विद्यार्थिनीला बुरख्यासह परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जातो. वास्तविक ‘नीट’ परीक्षेत हिजाबला (मुसलमान महिलांचे डोके आणि मान झाकण्याच्या वस्त्राला) अनुमती आहे; पण बुरख्याला नाही.

३. तिसरा व्हिडिओ राजस्थानमधील सीकर येथील आहे. यात उमेदवारांच्या पायजम्याचा नाडा आणि अगदी चेनही कापून काढण्यात आली. यानंतरच त्यांना प्रवेश मिळाला.

संपादकीय भूमिका

अशा घटनावरून ‘केवळ सरकार हिंदुत्वनिष्ठ असून चालत नाही, तर पूर्ण व्यवस्थेमध्ये हिंदुत्वनिष्ठ असणे आवश्यक आहे. असे झाले, तरच हिंदूंच्या समस्या आणि त्यांचे हित जोपासले जाईल’, हे लक्षात येते !