टपालवाहकाने दीड वर्ष टपाल वाटलेच नाही !

  • वेळणेश्वरमध्ये पोस्टाचा गलथान कारभार !

  • दोन पोती टपाले घरात सापडली

गुहागर – तालुक्यातील वेळणेश्वर येथे गेले दीड वर्ष पोस्टात आलेली टपाले  टपालवाहकाने (पोस्टमनने) वितरित केलेली नाहीत. ग्रामस्थांच्या वाढत्या तक्रारीनंतर नव्याने रुजू झालेले पोस्टमास्तर प्रसाद दिवाडकर यांनी केलेल्या पाठपुराव्यात ही घटना उघड झाली आहे.

१. वेळणेश्वर पोस्ट कार्यालयामध्ये बीड येथील करण थोरात नामक टपालवाहक आहे. येथील ग्रामस्थांकडून त्यांच्यासाठी आलेली टपाले भ्रमणभाषवर ‘ट्रॅकिंग रिपोर्ट’ आला असतांनाही घरी का पोचत नाहीत; म्हणून वेळणेश्वर पोस्ट कार्यालयात विचारणा चालू केली.

२. वेळणेश्वर पोस्ट कार्यालयामध्ये नव्याने रुजू झालेले पोस्टमास्तर प्रसाद दिवाडकर यांच्याकडे अनेक तक्रारी आल्यानंतर त्यांनी याविषयी चौकशी चालू केली.

३. त्यांनी टपालवाहक करण थोरात याच्याकडे विचारणा चालू केली; मात्र त्यावर टपालवाहक थोरात काहीच उत्तर देत नसल्याने शेवटी टपालवाहकाच्या घरी जाऊन पाहिले असता २ पोती भरलेली टपाले आढळून आली.

४. या पोत्यांमध्ये बँकांची लिलाव नोटीस, पासबुके, चेकबुक, आधारकार्ड, ए.टी.एम्. कार्ड, एल.आय.सी. सर्टिफिकेट, हायस्कूल, तसेच महाविद्यालयांना मुंबई विद्यापिठातून आलेली पत्रे आदी दीड वषपिक्षा अधिक कालावधीमधील टपाले मिळून आली.

५. पोस्ट निरीक्षक हिमांशू जोशी यांनीही सदर घटनेची पहाणी केली. तर जिल्हा कार्यालयातूनही अधिकारी वर्ग वेळणेश्वर पोस्ट कार्यालयामध्ये कार्यवाहीसाठी उपस्थित रहाणार आहेत.

हानीभरपाई कोण देणार ? – ग्रामस्थांची प्रतिक्रिया

आमची झालेली हानी कोण भरून देणार. मोजणीची नोटिसा टपालाने येऊनही संबंधितांना वेळीच न पोचल्याने अनेक वेळा मोजणीसाठी फी भरावी लागली. अनेकांची दागिन्यांच्या लिलावाच्या नोटिसा येऊनही त्यांना नोटिसा न मिळाल्याने काहींचे दागिन्यांचे लिलाव झाले. आधारकार्ड आणि पॅनकार्ड न मिळाल्याने अनेकांची कामे खोळंबली आहेत. यामुळे ग्रामस्थांकडून आमची हानीभरपाई कोण देणार ?, असा प्रश्न विचारला जात आहे.

 

संपादकीय भूमिका

दीड वर्ष टपाल वितरीत न करणे, हा केवळ कामचुकारपणा नसून जनतेचा विश्वासघात आहे, अशा कर्मचार्‍याकडून जनतेची झालेली हानी भरून घ्यायला हवी आणि त्याला कठोर शिक्षा करायला हवी !