रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘कार्तिकेय यज्ञा’च्या वेळी सुश्री संगीता जाधव यांना आलेल्या अनुभूती !

‘२७ आणि २८.९.२०२५ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘कार्तिकेय यज्ञ’ झाला. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

१. यज्ञस्थळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आगमन झाले. तेव्हा माझा भाव जागृत झाला आणि मला गुरुमाऊलींचे नारायणस्वरूपात दर्शन झाले.

२. ‘कार्तिकेय यज्ञ’ चालू असतांना ‘वैकुंठात भगवान श्रीविष्णु शेषनागावर पहुडला आहे आणि श्री लक्ष्मीमाता त्याच्या चरणांशी बसली आहे’, असे मला सूक्ष्मातून दिसले.

३. श्री. विनायक शानभाग गुरुदेवांची महती सांगत असतांना सूक्ष्मातून श्रीविष्णु लक्ष्मीला त्याविषयी सांगत असल्याचे दृश्य दिसणे आणि ते पाहून भावजागृती होणे

सुश्री संगीता जाधव

जेव्हा श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४३ वर्षे) गुरुदेवांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची) महती सांगत होते, तेव्हा मला सूक्ष्मातून पुढील दृश्य दिसले, ‘श्रीविष्णु श्री लक्ष्मीमातेला सांगत आहे, ‘पहा, पृथ्वीवर माझा जो अंशावतार (टीप) आहे, त्या अवताराची स्तुती चालू आहे.’ ते दृश्य पाहून माझी पुष्कळ भावजागृती होत होती. त्या वेळी ‘माझे संपूर्ण शरीर हलके झाले आहे’, असे मला जाणवत होते.

टीप – ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे श्रीविष्णूचे अंशावतार आहेत’, असा उल्लेख महर्षींनी नाडीपट्टीत केला आहे.

४. यज्ञस्थळी भगवान शिव आणि पार्वती उपस्थित असल्याची मिळालेली साक्ष !

मला सूक्ष्मातून पुढील दृश्य दिसले, ‘वैकुंठात आरती चालू आहे. तेथील देवीदेवता आरतीला उपस्थित आहेत. त्या वेळी तेथे भगवान शिव आणि पार्वतीमाता यांचे आगमन झाले. वैकुंठात शंखनाद झाला. शिव आणि पार्वतीमाता यांनी श्री कार्तिकेयाला आशीर्वाद देऊन शक्ती प्रदान केली, तसेच त्यांनी सर्व साधकांचे रक्षण होण्यासाठी आशीर्वाद दिले.’

त्याच वेळी यज्ञ चालू असतांना देवीच्या चित्राला वाहिलेले फूल पूजेत असलेल्या शिवपिंडीवर पडले. तेव्हा ‘यज्ञस्थळी भगवान शिव आणि पार्वती उपस्थित आहेत’, याची साक्ष मिळाली’, असे मला जाणवले. ते पाहून माझा भाव पुष्कळ जागृत झाला. ते दृश्य पुढे २ दिवस माझ्या डोळ्यांसमोर येत होते. गुरुदेवांच्या कृपेमुळे मला देवतांचे दर्शन झाले. ‘ही स्थिती प्रथमच अनुभवायला मिळाल्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सुश्री संगीता जाधव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.९.२०२५)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.