Farsa Wale Baba Murder : गोतस्करांचा पाठलाग करणारे गोरक्षक फरसा वाले बाबा यांना ट्रकने चिरडले

  • मथुरा (उत्तरप्रदेश) येथील घटना

  • समर्थकांकडून महामार्गावर दगडफेक, पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड

फरसा वाले बाबा (उजवीकडे)

मथुरा (उत्तरप्रदेश) – येथे चंद्रशेखर उपाख्य फरसा वाले बाबा या नावाने प्रसिद्ध असलेले गोरक्षक यांना ट्रकने चिरडल्याने त्यांचा मृत्यू झाला. गोरक्षक बाबांनी पहाटे ४ च्या सुमारास मथुरा-आगरा महामार्गावर एक कंटेनर थांबवला होता. यातून गोतस्करी केल्याचा संशय होता. ‘या वेळी कंटेनरच्या मागून येणार्‍या एका ट्रकने बाबांच्या दुचाकीला चिरडल्याने त्यांना मृत्यू झाला’, असे पोलिसांनी सांगितले; मात्र बाबांच्या समर्थकांनी बाबांची गोतस्करांनी हत्या केल्याचा आरोप करत येथे हिंसाचार करत निदर्शने केली. समर्थकांनी रस्ता बंद करत पोलिसांवर दगडफेक केली. यामुळे येथे अनेक घंटे तणावपूर्ण स्थिती होती. यानंतर पोलिसांनी स्थितीवर नियंत्रण मिळवले. या हिंसाचारात पोलिसांच्या ५ – ६ गाड्यांची तोडफोड करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी लाठीमार केला आणि अश्रूधुराचे नळकांडे सोडले.

काय घडले ?

बरसाना येथील अजानौख गावात गोशाळा चालवणारे फरसा वाले बाबा यांना माहिती मिळाली होती की, कोसी राष्ट्रीय महामार्गावर एका ट्रकमधून जनावरांची अवैध वाहतूक केली जात आहे. ही माहिती मिळताच, बाबा २ तरुणांसमवेत गोशाळेतून दुचाकीवरून निघाले. जेव्हा ते महामार्गावरील बाथन गेट परिसरात पोचले, तेव्हा त्यांना गायींची तस्करी करणार्‍यांचा एक ट्रक दिसला. जेव्हा बाबांनी ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तस्करांनी वेग वाढवला. सुमारे ७ किलोमीटरच्या पाठलागानंतर, बाबा कोतवान चौकी परिसरातील नवपूर गावात पोचले. त्यांनी ट्रॅकच्या समोर येऊन तो थांबवला. ते दुचाकीवरून खाली उतरल्यावर ट्रकचालकाने ट्रक चालू करून बाबांना चिरडले, असा आरोप त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. पोलीस बाबांचा मृत्यू नेमका कसा झाला ? याचे अन्वेषण करत आहेत. या घटनेच्या वेळी एका गोतस्कराला पकडण्यात आले, तर त्याचे २ साथीदार पळून गेले.

फरसा बाबा गोरक्षक म्हणून प्रसिद्ध होते. ते नेहमी हातात कुर्‍हाड बाळगत असत, त्यामुळे त्यांना ‘फरसा वाले बाबा’ हे टोपणनाव मिळाले.

संपादकीय भूमिका

  • देशातील अनेक राज्यांत गोहत्या बंदी कायदे करण्यात आले आहेत; मात्र पोलीस आणि प्रशासन निष्क्रीय अन् भ्रष्ट असल्याने गोहत्या थांबलेल्या नाहीत. त्यातच गोरक्षकांना अजूनही गोहत्या रोखण्यासाठी रस्त्यावर उतरून रात्री-अपरात्री कार्य करावे लागत आहे आणि त्यात अशा प्रकारच्या हत्या होत आहेत. पोलीस आणि प्रशासन यांना हे लज्जास्पद आहे !
  • केवळ कायदे करून गुन्हे थांबत नाहीत, तर त्यांची कठोर कार्यवाही करणे आवश्यक असते. गोहत्या, धर्मांतरविरोधी कायदे करूनही त्यांची कठोर कार्यवाही होत नसेल, तर त्यांचा काय उपयोग ?