इंधन टंचाईच्या भीतीने रत्नागिरी हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना निवेदन देतांना रत्नागिरी हॉटेल असोसिएशनचे पदाधिकारी

रत्नागिरी – आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम रत्नागिरीतील हॉटेल व्यवसायावर आणि विशेषतः व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांची भेट घेतली. हॉटेल व्यवसायाचा कणा असलेल्या गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत होऊ नये आणि तो सुरळीत राहावा, यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली. जिल्हाधिकार्‍यांनी हॉटेल व्यावसायिकांच्या अडचणी समजून घेतल्या असून, या संदर्भात संबंधित गॅस पुरवठा एजन्सींशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

१. रत्नागिरी हा पर्यटनाचा जिल्हा आहे. सध्या पर्यटन हंगाम चालू असतांना जर गॅसची टंचाई निर्माण झाली, तर हॉटेल सेवा कोलमडण्याची आणि त्याचा मोठा फटका पर्यटन उद्योगाला बसण्याची शक्यता व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

२. या बैठकीला हॉटेल संघटनेचे उपाध्यक्ष उदय लोध, सचिव सुनील देसाई, तसेच गणेश धुरी, सुहास ठाकुरदेसाई, श्री. वायंगणकर, श्री. जोग आणि इतर प्रमुख व्यावसायिक उपस्थित होते.

३. युद्धाच्या छायेमुळे उद्भवू शकणार्‍या गॅस टंचाईपासून जिल्ह्यातील हॉटेल आणि पर्यटन उद्योग वाचवण्यासाठी व्यावसायिकांनी प्रशासकीय स्तरावर हालचाली चालू केल्या आहेत.

घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा जिल्ह्यात सुरळीत असून विनाकारण संभ्रम निर्माण करू नये ! – मनुज जिंदल, जिल्हाधिकारी

घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत

रत्नागिरी (जिमाका) – रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा साठा पुरेसा उपलब्ध आहे. त्याचे वितरणही सुरळीत चालू आहे. बुकींगसाठी ऑनलाईनचा वापर करावा. नागरिकांनी विनाकारण गर्दी करुन संभ्रम निर्माण करू नये. जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.
जिंदल म्हणाले, ‘‘जिल्ह्यामध्ये ॅस सिलेंडरचे वितरण व्यवस्थित चालू आहे. जिल्ह्यात जवळपास २७ गॅस एजन्सीज आहेत. त्या सर्वांशी माझे बोलणे झाले आहे. त्यांची बैठकही घेतली आहे. जिल्ह्यातील पुरवठा अधिकारी यांच्याकडूनही मी माहिती घेतली आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये घरगुती गॅस चांगल्या पद्धतीने पुरवला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण गॅस एजन्सीमध्ये बुकींगसाठी गर्दी करू नये. अशा गर्दीमुळे संभ्रम निर्माण होऊ शकतो. गॅस एजन्सीज् २४ तास काम करीत आहेत.’’