
अ. नुकतेच मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठाने स्पष्ट केले, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये (मुलगा आणि मुलगी यांनी विवाह न करताच एकत्र रहाणे) महिला तेव्हाच सुरक्षित राहू शकतील, जेव्हा त्यांना पत्नीचा दर्जा मिळेल !’ हे माननीय उच्च न्यायालयाने सांगितले ते बरे झाले, कुणी धार्मिक अधिकारी व्यक्तींनी असे भाष्य केले असते, तर तथाकथित पुरोगामी एव्हाना तुटून पडले असते.
आ. दुसर्या एका निकालपत्रात ‘तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलीन यांनी सनातन धर्माविषयी केलेले विधान ‘हेट स्पीचच (द्वेषयुक्त भाषणच) आहे’, हेही माननीय उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
इ. ‘छावा चित्रपट समाजात फूट पाडणारा आहे किंवा मी मुसलमान असल्याने मला कामे मिळत नाहीत’, अशी धर्मांतरित ए.आर्. रहमान या संगीतकाराने केलेली विधानेही सध्या चर्चेत आहेत.
ई. ‘यंदा ‘वसंतपंचमी’ शुक्रवारी आली. त्यामुळे भोजशाळेत दुपारी १२ पर्यंत हिंदूंनी पूजा करावी. दुपारी १ ते ३ मुसलमानांनी नमाज पढावा आणि दुपारी ४ ते सूर्यास्तापर्यंत हिंदूंनी पुन्हा पूजा करावी’, असा आदेश सर्वाेच्च न्यायालयाने हिंदु पक्षाच्या मागणीवर दिला.
या सर्व घटना वाचून आणि ऐकून मला मराठीतील म्हण आठवली… ‘म्हातारी मेल्याचे दुःख नाही; पण काळ सोकावतो.’ या म्हणीचा अर्थ ‘एखाद्या गोष्टीमुळे झालेल्या तात्कालिक हानीपेक्षा त्या निमित्ताने चालू होणार्या वाईट परंपरेची किंवा सवयीची भीती वाटणे’ असा होतो, म्हणजे एखादी वाईट गोष्ट तुम्ही सहन केली किंवा त्या वेळी दुर्लक्षित केली, तर लोक तो तुमचा कमकुवतपणा समजून नंतर ती गोष्ट तुमच्या माथी मारतात, नव्हे ती एक अधिकारिक परंपरा होऊन बसते. ‘काळ कसा सोकावतो’, याची काही उदाहरणे मी या लेखातून आपल्याला सांगतो. त्यावरून त्या गोष्टीचा त्याच वेळी विरोध करणे आणि प्रतिवाद करणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येते.
१. स्वतःच्या वा पालकांच्या नकळत होणारे मुलांचे धर्मांतर

अ. अन्य पंथियांचे सण साजरे करून हिंदूंचे एक दिवसाचे धर्मांतर : माझ्या एका परिचितांचा लहान मुलगा सुनील हा घाईने कसली तरी सिद्धता करत होता. सुनीलच्या वडिलांनी गुपचूप एक नवीन हातमोजा घेतला आणि त्यात कॅडबरीचे काही चॉकलेट्स घातले. मी त्यांना कुतूहलाने विचारले, ‘‘हे काय करत आहात ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘नाताळाच्या काळात सांताक्लॉज येऊन लहान मुलांना खाऊ आणि भेटवस्तू वाटतो. तो या भेटवस्तू किंवा खाऊ हातमोज्यामध्ये घालून देतो, अशी दंतकथा आहे. मुलांना ते खरे वाटावे, यासाठी मी सुनीलसाठी तसे करत आहे. तेवढीच मुलांना गंमत !’’
हे पाहून मी अगदी अवाक् झालो. सुनीलच्या वडिलांना मी म्हटले, ‘‘थोडा वेळ यातील गंमत बाजूला ठेवा; परंतु याचे दूरगामी परिणाम काय होतील ? याचा विचार तुम्ही केला का ? जी दंतकथा आहे, ती खरी म्हणून तुम्ही मुलाच्या मनावर बिंबवत आहात. ‘सर्वधर्मसमभावाच्या आणि गमतीच्या नावाखाली या माध्यमातून आपण आपल्या मुलांचे एक दिवसांचे धर्मांतर करत आहोत’, असे तुम्हाला वाटत नाही का ? अर्थात सुनीलच्या बुद्धीजीवी वडिलांनी माझे म्हणणे हसण्यावारी नेले.
हे प्रकरण इतक्यावरच थांबते, असे नाही. आज शाळांमध्ये नाताळच्या कालावधीमध्ये मुलांना ‘ख्रिसमस ट्री’ करून आणायला सांगतात. तशाच स्पर्धेचे शाळेत आयोजन करतात. काही ठिकाणी रमजान ईदच्या काळामध्ये गंमत म्हणून ‘शीरखुर्मा’ (शेवयांची सुकामेवा घालून केलेली खीर) करून आणायला सांगितले जाते. मध्यंतरी तर काही शिक्षकांनी मुलांना मशिदीत नेऊन कलमा पढायला सांगितल्याच्या घटनाही निदर्शनास आल्या आहेत. या सर्व घटना दिसायला छोट्या असल्या, तरी किती घातक आहेत, याची कल्पना आता येते. सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली हे एकप्रकारचे ‘स्लो पॉयझन’ (हळूहळू पसरणारे विष) आहे, जे बालपणीच केवळ हिंदु मुलांना पाजले जाते. अन्य पंथांची मुले सत्यनारायण पूजा किंवा सरस्वतीपूजा केली, तर त्याचा प्रसाद हातावर घेतात का ? याचे सर्वेक्षण केले, तर कळेल.
आ. पाश्चात्त्य पद्धतीने वाढदिवस साजरा करणे : आता याचे गंभीर परिणाम, म्हणजे आरंभी आपल्याकडे औक्षण करूनच वाढदिवस साजरा करण्याची पद्धत होती, ती आता जवळपास बंद पडत आहे. आता सर्रास सर्वत्र केक कापून आणि मेणबत्त्या विझवून वाढदिवस साजरा केला जातो. त्यातही आता भयानकता वाढत जाऊन तो केक तोंडाला फासणे किंवा त्या केकमध्येच वाढदिवस असणार्याचे तोंड खुपसणे, असे अपप्रकार होऊ लागले आहेत. वाढदिवसाला मित्र-मैत्रिणींना बोलावून मद्याच्या मेजवान्या चालू झाल्या आहेत.
इ. हिंदूंची मुले हिंदु देवतांविषयी आता पालकांना प्रश्न विचारतात. ‘अन्य पंथीय कसे मानवतावादी वा सुधारमतवादी आहेत आणि आपण कसे बुरसटलेल्या विचारांचे आहोत’, असा युक्तीवाद ते पालकांशी करत आहेत.
ई. राष्ट्रपुरुषांविषयी अपसमज : एका युवकाने तर मला विचारले, ‘‘छत्रपती शिवरायांचे राज्य केवळ महाराष्ट्र आणि फार तर २-३ राज्ये आणखी इतकेच पसरलेले होते, तरी तुम्ही त्यांचा इतका उदो उदो का करता ? त्यांच्यापेक्षा कितीतरी मोठ्या विस्ताराची राज्ये अन्य राजांनी सांभाळली आहेत.’’ मी त्याला विचारले, ‘‘तुला तुझ्या घरातील समस्या तरी सोडवता येते का ? छत्रपती शिवरायांनी कोणत्या परिस्थितीत हिंदवी स्वराज्य उभारले, याची कल्पना तुला आहे का ? तुला सर्व अनुकूलता असूनही घरातील समस्या सोडवता येत नाहीत, तर छत्रपतींनी ५ पातशाह्यांचा निःपात करून स्वराज्य कसे उभारले असेल, याचे चिंतन कर. तुझे उत्तर तुला मिळेल.’’ मी तुम्हाला आपल्या बालकांच्या शाळांमध्ये घडणारी एक दोनच छोटी उदाहरणे आणि त्यांचे दुष्परिणाम आपल्याला सांगितले. आता याला ‘काळ सोकावला’, असे नाही म्हणायचे, तर दुसरे काय ?
२. देवतांचे विडंबन वेळीच न थांबवल्याने झालेली आजची स्थिती !
अ. कलाकृतींच्या माध्यमातून विडंबन : माझ्या एका नातेवाईकाचा मुलगा शाळेत जात असतांना त्याच्या आईने कलाकृती म्हणून त्याला भाज्यांपासून बनवलेला गणपति सिद्ध करून दिला. त्याच्या आईला विचारल्यावर कळले की, त्यांच्या शाळेत विविध पदार्थांपासून गणपतीची मूर्ती सिद्ध करून आणण्याची स्पर्धा होती. तेव्हा काही मुलांनी कचर्यापासून, तर काहींनी घरातील अन्य टाकाऊ वस्तूंपासून गणपतीची मूर्ती बनवून आणल्या होत्या. ‘या स्पर्धेतून मुलांच्या कलागुणांना वाव देणे’, असा शाळेचा उद्देश होता; परंतु या माध्यमातून ‘कोणत्याही गोष्टीपासून गणपतीची मूर्ती सिद्ध करण्यातून आपण गणपतीचे विडंबन करत आहोत’, हे शिक्षक आणि पालक यांनाही लक्षात येऊ नये, याचे दुःख वाटले.
आ. चित्र काढण्याच्या माध्यमातून विडंबन : एकेकाळी पंढरपूरला चित्रपटाची भित्तीपत्रके रंगवणारा एम्. एफ्. हुसेन नावाचा एक सामान्य रंगारी काही चित्रे काढून एक जगप्रसिद्ध कलाकार झाला. त्याने मोठे नाव कमावण्याविषयी आमची तक्रार नाही; परंतु नंतर ‘आपण कलेतील सर्वज्ञ झालो’, या अविर्भावात त्याने हिंदु देवता आणि भारतमाता यांची विटंबना करणारी काही अश्लील चित्रेही काढली. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली तत्कालीन कलाकार आणि शासनकर्ते यांनी या विकृत चित्रकाराची पाठराखण केली. यानंतर लवकरात लवकर प्रसिद्धी मिळवण्यासाठी तशी चित्रे काढण्याचा पायंडा पडला. या विकृत चित्रकाराला वेळीच आवर घातला असता, तर पुढे अशी घाणेरडी चित्रे काढण्याची विकृती ही संस्कृती म्हणून पुढे आली नसती.
इ. नाटके आणि चित्रपट यांच्या माध्यमातून विडंबन : याचप्रमाणे काही नाटकांमधून देवतांचे विडंबन सर्रास केले जाऊ लागले. देवतांना विनोदी पात्र म्हणून दर्शवले जाऊ लागले, तेव्हा नाट्यरसिकांनी त्याला विनोदबुद्धीची झालर देऊन त्याकडे दुर्लक्ष केले. नंतरच्या काळात देवतांची अवहेलना करणारी अनेक नाटके येऊ लागली.
चित्रपटातही देवता या विनोदी पात्र ठरू लागल्या. प्रारंभीच्या काळात ‘जीवन’ नावाचे एक सिनेकलाकार देवर्षि नारद यांची भूमिका करायचे. त्या वेळी जीवन हे ‘देवर्षि नारद, म्हणजे कळ लाव्या विनोदी मनुष्य’ असल्याप्रमाणे नारद यांची भूमिका सादर करायचे. यावरून लोकांच्या मनात देवर्षि नारद यांची प्रतिमा ‘लावालावी करणारे व्यक्तीमत्त्व’, अशी निर्माण झाली. यातून नवीन पिढीसमोर कोणता आदर्श निर्माण झाला ?
आज हिंदूंना एकतर त्यांच्या देवता आणि ऋषिमुनी यांच्याविषयी माहिती नसते अन् जरी माहिती असली, तरी ती चित्रपटात पाहिल्यानंतरची अर्धवट आणि चुकीची माहिती असते. हेही काळ सोकावल्यानंतर होणार्या दुष्परिणामांचे एक उदाहरण आहे.
३. कथित नास्तिक, पुरोगामी आणि विद्रोही यांच्याकडून देवता अन् संत यांच्याविषयी हिंदूंच्या मनातील श्रद्धेवर घाला !
आमच्या लहानपणी अनावधानानेही देवतांविषयी काही अयोग्य बोलले गेल्यास वडीलधारी मंडळी योग्य प्रकारे; पण कठोर अशी समज देत असत. त्यामुळे देवता या पूजनीय असतात आणि त्यांच्याविषयी नम्रतेनेच बोलायला हवे, असा संस्कार आपोआपच आमच्या मनावर झाला होता.
अ. नास्तिकतावाद्यांकडून होणारे आघात : अशातच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ‘सत्यनारायण पूजा, म्हणजे अंधश्रद्धा’ अशा प्रकारचे लिखाण भिंतीवर केले जाऊ लागले. मंदिरातील अस्वच्छतेचे निमित्त करून ‘जो देव स्वतःच्या अवतीभवती स्वच्छता करू शकत नाही, आपल्या पायाशी येणारी कुत्री हाकलू शकत नाही, स्वतः स्वतःची अंघोळ करू शकत नाही, तो देव कसा ? स्वच्छताच सर्वकाही आहे…’, इत्यादी गोष्टी गाडगेबाबा यांच्या नावाने समाजात शिकवल्या जाऊ लागल्या. त्या वेळी समाजात काही प्रमाणात अंधश्रद्धेपोटी फसवणुकीचे काही प्रकार घडत असल्यामुळे तत्कालीन समाजधुरिणांनी अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना प्रोत्साहन दिले. त्या वेळी हा एकप्रकारे हिंदूंच्या श्रद्धेवर घाला घालण्यासाठीचा कावा आहे, हे बुद्धीजीवी समाजाला लक्षात आले नाही.
आ. विद्रोह्यांकडून संतांविषयी विद्वेष पसरवणे : मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना एका स्नेह संमेलनात विद्रोही लेखक मा.म. देशमुख आमच्या महाविद्यालयात आले होते. त्या वेळी त्यांनी समर्थ रामदासस्वामी, त्यांच्या शिष्या वेण्णास्वामी अन् आक्कास्वामी यांच्याविषयी अभद्र वक्तव्य केले. समर्थ रामदासस्वामी यांच्याविषयी या लोकांनी समाजात इतका विद्वेष वाढवला की, ‘ते छत्रपती शिवरायांचे गुरु होते’, हे हिंदूच नाकारायला लागले. हा त्या वेळचा आरंभ धरला, तर आज हिंदु संतांवर कुणीही उठसूठ टीका करतो. त्यांना कल्पना आहे की, हिंदू याविषयी काहीच करणार नाहीत.
इ. हिंदूंमध्ये जातीवरून फूट पाडणे : समाजामध्ये जातीवरून फूट पाडण्याचा प्रयत्नही मागील काही दशकांत चालू झाला. ब्राह्मण-बहुजन वादातून हिंदु समाज एकमेकांपासून दुरावला. त्याचा परिणाम म्हणून काही वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांना शस्त्रांचे शिक्षण देणारे गुरु दादोजी कोंडदेव यांचा पुतळा पुण्याच्या लाल महालातून गायब झाला. अशा विद्रोही लोकांनी हिंदु धर्माविषयी किती प्रचंड वैचारिक घाण करून ठेवली आहे, हे या उदाहरणांतून आज आपल्या डोळ्यांसमोर येते.
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– श्री. योगेश जलतारे, संपादक, ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यम समूह.
| लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/1010690.html |
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !