हर्णे ( दापोली ) येथील सुवर्णदुर्ग येथे भव्य स्वच्छता मोहीम : विद्यार्थ्यांनी श्रमदानातून खुलवल्या ऐतिहासिक वाटा !

हर्णे, १८ जानेवारी (वार्ता.) – ऐतिहासिक वारसा लाभलेल्या दापोली तालुक्यातील हर्णे येथील किल्ले श्री सुवर्णदुर्ग येथे १० जानेवारी २०२६ या दिवशी चौथी स्वच्छता मोहीम यशस्वीपणे पार पडली. ‘एक ऐतिहासिक भटकंती’, ‘शिवशंभु प्रतिष्ठान’ आणि ‘एक आस गडकोटांची’ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेत शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेऊन ऐतिहासिक वास्तूचे रूप पालटले.

या दुर्गसंवर्धन मोहिमेत प्रामुख्याने एम्.के. इंग्लिश स्कूल, आंजर्ले आणि वेळवी पंचक्रोशी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, वेळवी येथील ‘एम्.सी.सी.’ आणि ‘स्काऊट गाईड’चे विद्यार्थी सहभागी झाले होते. हातात विळे, कुदळ आणि झाडू घेऊन या विद्यार्थ्यांनी गडपरिसरात श्रमदान केले.

१. गेल्या काही काळापासून सुवर्णदुर्ग परिसरात मोठ्या प्रमाणात रानटी झाडे आणि काटेरी झुडपे वाढली होती. त्यामुळे पर्यटकांना या दुर्गावर चालणेही कठीण झाले होते. अनेक ठिकाणी वाटा बुजल्या होत्या आणि दुर्गाचे भव्य बुरुज आणि तटबंदी झाडांमुळे दिसेनाशी झाली होती.

२. संदेश महाडिक आणि चिन्मय गुरव यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमेत विद्यार्थ्यांनी दुर्गावरील मुख्य वाटा मोकळ्या केल्या. तटबंदी आणि बुरुजांवरील अनावश्यक गवत आणि झाडे काढून टाकली. दुर्गाच्या महत्त्वाच्या भागांची संपूर्ण स्वच्छता केली. यामुळे आता गडाची भव्य रचना पर्यटकांना स्पष्टपणे पहाता येणार असून पर्यटनासाठी हा गड अधिक सुकर झाला आहे.

३. स्वच्छता मोहीम चालू असतांना दुर्गावर एका ठिकाणी प्राचीन ‘सोहळा सीडी’ या खेळाचे अवशेष पहायला मिळाले. इतिहास अभ्यासकांच्या मते, हा खेळ प्राचीन काळी व्यापारी लोक खेळत असत. विशेष म्हणजे, आजही हा खेळ चीनमध्ये खेळला जातो. या शोधामुळे सुवर्णदुर्गाच्या ऐतिहासिक आणि जागतिक व्यापारी संबंधांवर नवा प्रकाश पडण्याची शक्यता आहे.

४. या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी आंजर्ले हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. गोरीवले, वेळवी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले, तसेच आंजर्ले येथील शिक्षकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

५. दुर्गप्रेमींनी या उपक्रमाचे मोठे कौतुक केले असून, या मोहिमेमुळे सुवर्णदुर्गाचे ऐतिहासिक महत्त्व आणि सौंदर्य आता पर्यटकांना अधिक जवळून अनुभवता येणार आहे.

या वेळी सुचिता सावंत, हर्षदा पवार, सर्वश्री अनिकेत दांडेकर, सिद्धेश चोगुले, मंगेश पाटील, हरीश चोगुले, अनंत पाटील, भालचंद्र कोकणे, जगदीश परांजपे, वीरेंद्र करळकर, युवराज पवार, अभिषेक वाडकर, जालंदर बुरोंडकर आणि हर्णै येथील ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य मिळाल्यामुळे मोहीम क्रमांक ४ फत्ते झाली. तरुण पिढीने अशा प्रकारे पुढाकार घेऊन समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.