काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी १ जुलै या दिवशी संसदेत केलेल्या भाषणात ‘हिंदूंना हिंसक’ म्हटले. होय हिंदू हिंसकच; पण कधी झाले ? ते हिंसाचारी होण्याचे कारण काय ? यावर विचार करणारा एक मुद्दा येथे राहुल गांधींना विचारणार आहे.
राहुल यांना हिंसकची व्याख्या तरी काय आहे, हे ठाऊक आहे का ? ठाऊक नसेल, तर त्याची आधी व्याख्या सांगा. हातामध्ये राज्यघटना घेऊन फिरणारे ‘हिंसक’ या शब्दाची व्याख्या राज्यघटनेत तरी आहे का ? हे तरी पडताळले आहे का ? याच्यावर दृष्टीक्षेप टाकणारे विचार येथे मांडत आहे.
१. ‘हिंसा’ शब्दाचा खरा अर्थ
‘हिंसा’ हा शब्द संस्कृतमध्ये आहे. त्यातील एक श्लोक ही पुष्कळ प्रचलित आहे आणि तो आजच्या क्षणाला अधिक आवश्यक आहे, ‘अहिंसा परमो धर्मः ।’, असे म्हणत आणि मानत असले, तरी पुढे ‘हिंसा धर्म तंदेवच ।’ असे हिंदुत्वाने म्हटले आहे. अहिंसा हा मानवाचा खरा धर्म असला, तरी जेव्हा धर्म संकटात येतो, तेव्हा त्याचे रक्षण करण्यासाठी हातात शस्त्र घेऊन हिंसा करणेही हिंदुत्वाने न्याय आणि उचित मानले आहे.
‘हिंसा’ हा शब्द राहुल गांधींनी नाही, तर कित्येक वर्षांपूर्वी हिंदूंच्या धर्मग्रंथात लिहिलेला आहे. त्यामुळे राहुल गांधींनी ‘हिंसा’ या शब्दाचा चांगला; पण न कळणारे अर्थ काढले आहेत.
२. राहुल यांच्या मते खालील घटना हिंसा आहेत का ?
ज्या गोष्टींना राहुल गांधी यांनी ‘हिंदूंना हिंसक’ असा शब्द वापरला आहे, त्या गोष्टी त्यांना हिंसक वाटतात का ? याविषयी काही प्रश्न येथे देत आहे.
अ. हिंसाचारी मोगल हिंदूंवर तुटून पडले होते, त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘मुहब्बतकी दुकान’ (प्रेमाचे दुकान) उघडले नाही, तर हातात धारदार तलवार घेऊन (हिंसेचा हिंसेने) विरोध केला. राहुल यांच्या मते ही हिंसा आहे का ?
आ. इंग्रजांनी भारतावर १५० वर्षे राज्य केले. त्यांनी भारत आणि हिंदू विरोधी अनेक कायदे केले, भारताचे तुकडे तुकडे केले, अशा ब्रिटिशांच्या विरुद्ध एकेकाळी काँग्रेसमध्ये राहून अहिंसेला त्रासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ‘आझाद हिंद सेना’ स्थापन केली. यानंतर त्यांनी ब्रिटिशांना युद्धाची चेतावणी दिली. ही चेतावणी हिंसा आहे का ?
इ. रावणाने सीतामातेचे अपहरण केले, त्या वेळी प्रभु श्रीराम गप्प बसले नाहीत, तर त्यांनी धनुष्यबाण घेऊन वानरांसह त्याच्यावर आक्रमण केले. राहुल यांच्या लेखी हीसुद्धा हिंसा आहे का ?
ई. कौरवांनी पांडवांवर अन्याय केला. अशा अन्यायाच्या विरोधात पांडवांनी श्रीकृष्णासह १८ दिवस युद्ध करून ‘महाभारत’ झाले. अन्यायाच्या विरोधात लढा देणे, हीसुद्धा हिंसा आहे का ?
उ. पाकिस्तान एका मागोमाग एक सातत्याने भारतावर आतंकवादी आक्रमण करत आहे. अशा वेळी आताच्या सरकारने चर्चेचे कबुतर उडवले नाही, तर निर्भय भारतीय सैन्याने ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून त्यांना प्रत्युत्तर दिले. काय ही हिंसा आहे का ?
अशा कित्येक घटना हिंदु धर्म आणि भारत देश यांमध्ये आहेत. अशा घटनांना राहुलजी तुम्ही काय सांगणार ? या घटनांना तुमच्या शब्दकोशामध्ये कोणता शब्द आहे ? हे त्यांनी स्पष्ट सांगावे. स्वतःच्या घरी एका उंदराने जरी उपद्रव केला किंवा छोटासा डास जरी चावला, तरी त्यांच्यावर आपण प्रेम करतो का ? मग त्याच्या विरोधात आपण जी कृती करतो, त्याला राहुल गांधी यांच्या शब्दकोशात कोणता शब्द आहे ? आतंकवादी अजमल कसाब भारतात आक्रमण करतो आणि त्याला शिक्षा होऊ नये म्हणून तुमचेच कथित (अ)हिंसक त्याच्या बाजूने उभे रहातात, काय ही हिंसा नाही का ?
३. अन्य धर्मियांना ‘हिंसाचारी’ म्हणण्याचे धाडस दाखवणार का ?
तुमच्या भाषेत ‘हिंसा’ आणि ‘अहिंसा’ यांना काही अर्थ नाही अन् या माध्यमातून तुम्ही समस्त हिंदूंना एक प्रकारे ‘हिंसाचारी’, असे म्हटले आहे. तुम्ही ज्या देशात उभे आहात, ज्या देशात तुम्ही खासदार म्हणून संसदेत असे चुकीचे बोलत आहात, त्या देशातील हिंदु जर हिंसक असते, तर तुम्ही संसदेत असे बोलू शकला असता का ? अन्य धर्मियांविषयी असे उघडपणे बोलून दाखवू शकता का ? नाही; कारण असे बोलले, तर काय परिणाम होतील, हे तुम्हाला चांगले लक्षात आहे ना ? अन्य धर्मीय जे तुमच्याविषयी करून दाखवतील, तिला ‘हिंसा’ नाही, तर अन्य कोणता शब्द आहे ? राजस्थानच्या कन्हैयालाल यांची हत्या अशा हिंसेमुळे झाली, ती हिंसा नाही का ? भाजपच्या नुपूर शर्मा यांनाही शिरच्छेद करण्याच्या ज्या धमक्या देण्यात आल्या, त्या अहिंसा आहेत का ? त्या धमक्या देणारे हे कोणत्या धर्माचे होते ?
४. हिंदूंनी मतपेटीच्या माध्यमातून काँग्रेसला कायमचे घरी बसवले तर…
राहुल गांधींची मानसिकता पहाता त्यांच्यामध्ये हिंदूंविषयी किती द्वेष पसरला आहे, हे यातून लक्षात येते. राहुल यांना ‘हिंदु’ शब्दाचा अर्थ वा त्याची व्याख्या तरी ठाऊक आहे का ? हिंदु शब्दाची व्याख्या आहे, ‘हीनं दूषयति इति हिन्दुः ।’ म्हणजे ‘हीन किंवा कनिष्ठ अशा रज आणि तम गुणांचा ‘दूषयति’ म्हणजेच नाश करणारा, तो हिंदु’, अशी ‘हिंदु’ शब्दाची व्युत्पत्ती दिली आहे. राहुल गांधी यांनी स्वतःचे वेगळेपण दाखवण्यासाठीच ही सर्कस केली आहे, असे वाटते. असे वक्तव्य करून त्यांनी देशाचा पर्यायाने भारतियांचा अपमान केला आहे. राहुल गांधी यांनी समस्त हिंदूंची सार्वजनिकरित्या क्षमा मागावी, अन्यथा येत्या काळात हिंदूंनी मतपेटीच्या माध्यमातून तुमच्यासह काँग्रेसला कायमचे घरी बसवले, तर आश्चर्य वाटायला नको. त्यामुळे येणारी ५ वर्षे संसदेत बसण्यासाठी खासदारकीची पात्रता सांभाळून ठेवा !
– श्री. प्रशांत हरिहर, मंगळुरू, कर्नाटक. (२.७.२०२४)