आज ‘चांदोबाचा लिंब’ येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पहिले उभे रिंगण !

पुणे – लोणंद येथून तरडगाव, फलटण येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी प्रवास करते. या मार्गावरील ‘चांदोबाचा लिंब’ येथे चांदोबाचे मंदिर आहे. येथे पालखीचे पहिले रिंगण पार पडते. पालखी सोहळा काही वेळ विसावतो. रिंगणानंतर पालखी सोहळा तरडगावी विसावतो. यंदाचे पहिले उभे रिंगण ८ जुलै या दिवशी होणार आहे.

चोपदारांनी उभे रिंगण करण्यासाठीच्या जागेची पडताळणी केल्यानंतर पालखी सोहळ्यापुढचे २ अश्व धावतात. एकावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली स्वार असतात, तर दुसर्‍यावर शितोळे सरकारांचा आळंदी संस्थानच्या अश्वावर चोपदार हातात झेंडा घेऊन बसलेले असतात. चोपदारांनी दंड उंचावून संकेत केल्यानंतर दोन अश्व वेगाने धाव घेत दिंड्यांच्या पुढील टोकाला जातात, पुन्हा माऊलींच्या रथापर्यंत येतात. अश्वांच्या टापाखालील माती कपाळी लावण्यासाठी वारकरी आणि भाविक यांची अलोट गर्दी होते. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पहिले अश्व रिंगण बेलवडी (ता. इंदापूर) येथे ८ जुलै या दिवशी होईल. त्यानंतर पालखीचा मुक्काम अंथुर्णे येथे होईल.

रिंगणात प्रथम झेंडेकरी, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी आणि विणेकरी, त्यानंतर मानाच्या पालख्यांच्या समवेत अश्व आखलेल्या रिंगणाच्या ३ फेर्‍या पूर्ण करतो. अश्वांचे पूजन झाल्यानंतर रिंगणास प्रारंभ होतो. रिंगणातील अश्वाच्या पायाखालील माती भाळी लावणे, हे वारकरी भाग्य समजतो.