आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे २४ घंटे दर्शन चालू !

पंढरपूर, ७ जुलै (वार्ता.) – प्रतिवर्षी आषाढी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता यात्रा कालावधीत चांगला मुहूर्त आणि दिवस पाहून श्री विठ्ठलाचा पलंग काढून भाविकांना २४ घंटे दर्शन उपलब्ध करून देण्यात येते. ७ जुलै हा चांगला दिवस असल्याने विधीवत् पूजा करून विठ्ठलाचा पलंग काढण्यात आला आहे. विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड, तर रुक्मिणीमातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या दिला आहे. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे २४ घंटे मुखदर्शन, तर २२ घंटे १५ मिनिटे पदस्पर्श दर्शन चालू रहाणार असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. पलंग काढल्याने काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती आदी नित्योपचार बंद होऊन नित्यपूजा, महानैवेद्य आणि गंधाक्षता हे नित्योपचार चालू रहातील. २६ जुलैपर्यंत (प्रक्षाळपूजा) २४ घंटे दर्शन उपलब्ध असणार आहे.

दर्शनरांगेत बॅरीकेटींग करून त्यावर ताडपत्री शेड, जादा पत्राशेडची निर्मिती, आपत्कालीन गेट, विश्रांती कक्ष, तात्पुरती शौचालये, बसण्याची सुविधा, लाईव्ह दर्शन, कुलर-पंखे यांची सोय केलेली असून पिण्याचे पाणी वाटप करण्यात येत आहे. दर्शनरांग जलद पुढे नेऊन भाविकांना सुलभ दर्शन देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.