आनंद देता येत नसल्यास कुणालाही दुःख देऊ नये ! – आचार्य श्रीगुरु डॉ. सुनीलदादा लुले

आचार्य श्रीगुरु डॉ. सुनीलदादा लुले

नगर – आनंद देता येत नसल्यास कुणालाही दुःख देऊ नये. आपल्याकडून कुणीही दुखावले जाणार नाही याची काळजी घेणारेच परमार्थाच्या मार्गावर वाटचाल करू शकतात, असे वेदांताचे गाढे अभ्यासक आचार्य श्रीगुरु डॉ. सुनीलदादा लुले यांनी परखडपणे सांगितले.

श्रीमद् आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त येथील ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण मंडळाच्या वतीने रासनेनगरमधील श्रीदुर्गामाता मंदिराच्या सभागृहात आयोजित केलेल्या प्रवचनमालेत द्वितीय पुष्प गुंफतांना ते बोलत होते. श्री. एस्.एम्. कुलकर्णी यांनी स्वागत केले. श्री. अविनाश धर्माधिकारी आणि श्री. नाना देवकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. इंजिनिअर एन्.डी. कुलकर्णी यांच्या हस्ते प्रवचनकार डॉ. लुले यांना शाल आणि पुष्पहार घालून गौरवण्यात आले. श्री. विठ्ठलराव बागडे यांनी मधुर स्वरात गुरुस्तवन गायले.

आचार्य श्रीगुरु डॉ. सुनीलदादा लुले पुढे म्हणाले, ‘‘उमेदवारीसाठी पक्ष बदलणारे राजकारणी मतलबीच असतात. पक्ष केव्हाही बदलता येत असल्याने उमेदवारी मिळाली नाही, तर लगेच पक्ष बदलला जातो तो स्वतःचा मतलब म्हणूनच ! राजकीय पक्ष बदलणार्‍यांसारखे आपण वागावे कि भगवंताच्या पक्षात रहावे, हे आपणच ठरवायचे असते. प्रापंचिकांची बुद्धी जड-स्थूल असते. तिला हे सहज कळत नाही. श्री समर्थ रामदासस्वामींनी विषय सुख शाश्वत आनंद देणारे नाही, हे दासबोध ग्रंथामध्ये समजावून सांगितले असले, तरी विषय सुखामागे धावणार्‍यांची पळापळ आपण पहातोच. प्रापंचिक गोष्टीत रमणे-रेंगाळणे उपयोगाचे नसते. वर्षानुवर्षे परमार्थाविषयी ऐकून आत्मानंदात त्याचे रूपांतर होत नाही. केवळ बुद्धीने परमार्थ होत नाही. बुद्धीने जाणून घेऊन बुद्धी समर्पित करत शरण जावे लागते. भगवान श्रीकृष्ण गीतेच्या माध्यमातून आपणास जातीय राजकारण नव्हे जातीय परमार्थ सांगतात. नित्यजात म्हणजे आत्मा. आत्मा अविनाशी आहे. कधीही मरत नाही. अनित्य जात म्हणजे शरीर होय. आपली एकाग्रता भंग होता कामा नये, इतके एकाग्र होता आले पाहिजे.’’

भगवान श्रीकृष्ण, भगवान श्रीराम, भगवान श्रीदत्तात्रेय यांचा जन्मोत्सव आपण साजरा करताना त्यांनी जन्म घेतला नाही तर ते प्रगट झाले हे वास्तव लक्षात घेतले पाहिजे. त्यांचे प्रागट्य कोणी पाहिले नाही आणि जाणेही कोणी पाहिलेले नाही. श्रीरामांनी शरयू नदीत देह समर्पण केला. तो देह कोणालाही पुन्हा दिसला नाही! भगवान श्रीकृष्ण जाताना त्यांच्या देहाच्या जागी केवळ फुले दिसली! तिरोधान म्हणजे जाणे. त्यांना जन्म नाही. मरण नाही. त्यांचा देह चैतन्यरूप असतो म्हणून तो म्हाताराही होत नाही. म्हणूनच देवांचे म्हातारे झालेले फोटो कोठेही दिसत नाहीत. आपणही स्वानंदघन आनंदरूप आहोत, हेच विसरतो आणि दुःख उगाळत शोक करत बसतो.

तत्वज्ञान दुसर्‍याला शिकवण्यासाठी नसते तर स्वतःला जगण्यासाठी असते. जीवनात घेतलेल्या अनुभवाचे प्रतीक चेहर्‍यावरील सुरकुत्या असतात. ज्याला जीवन अखंड आनंदात घालवता येते तोच खरा पराक्रमी होय. परमार्थात पुरूषार्थाने यश येते. आपल्याला शोक मुक्त शोक रहित रहाता आले की, आनंद आपल्या पुढ्यात येतो. वसंतऋतुचा बहार सृष्टीमध्ये सर्वत्र आनंद निर्माण करतो. आपल्या ह्रदयात वसंत फुलावा याकरिता आपल्यातील अहंकार नामशेष करावा, असे आवाहन आचार्य श्रीगुरु डॉ. सुनिलदादा लुले यांनी केले.

वेदांत तत्त्वज्ञान आणि गीतेमधील संदेश आजही आपल्यास मार्गदर्शन करते हे विविध उदाहरणे देत सोप्या शब्दांत सांगितल्याने श्रोत्यांना प्रवचन चांगलेच भावले. शहराच्या विविध भागांमधील जिज्ञासू स्त्री-पुरुष भाविक मोठ्या संख्येने श्रवणानंद घेण्यास उपस्थित होते. सनातन संस्थेच्या सात्त्विक उत्पादनांचा आणि अभ्यासपूर्ण ग्रंथाचा स्टॉल भाविकांचे विशेष आकर्षण ठरला. भाविकांनी येथे खरेदीचा आनंद लुटला.