भविष्यात कार्बनमुक्त आणि अपघातविरहित वाहतूक व्यवस्था उभारण्यावर भर देणार ! – डॉ. रेजी मथाई

पुणे – दळणवळण अधिक सक्षम होण्यासाठी ‘व्हिजन झिरो’ आणि ‘नेट झिरो’ संकल्पना राबवण्यात येत आहे. इलेक्ट्रॉनिक, तसेच संगणकीय प्रणालीचा वापर वाढवून कार्बनमुक्त आणि अपघातमुक्त वाहतूक कशी बनवता येईल ? या दृष्टीने सध्या विचारविनिमय केला जात आहे. प्रगत तंत्रज्ञान आणि नवीन संकल्पना यांच्या साहाय्याने शाश्वत इंधनावर चालणार्‍या गाड्यांची निर्मिती होत आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक व्हेईकल्स (ईव्ही) रस्त्यावर येत असून त्यासाठी पूरक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी प्रयत्न चालू आहेत, असे मत ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’चे (ए.आर्.ए.आय.) संचालक डॉ. रेजी मथाई यांनी व्यक्त केले.

सौजन्य : सर्जनशील NEWS

‘सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स इंडिया’ आणि ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील भविष्यात येणार्‍या नवप्रवाहांवर विचारमंथन करण्यासाठी ‘ऑटोमोटिव्ह फ्युचर ट्रेंड्स’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते.

या वेळी होमिओपॅथ आणि कौन्सिलर डॉ. मीनल सोहोनी, ए.आर्.ए.आय.च्या उपसंचालिका उज्ज्वला कार्ले, ‘फोर्स मोटर्सचे डॉ. बाळासाहेब शिंदे, ‘सागे इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी’चे महेश शिंदे, ‘एम्.आय.टी. विश्वशांती विद्यापिठा’तील संशोधक प्राध्यापक डॉ. आनंद कुलकर्णी यांनी या चर्चासत्रात मार्गदर्शन केले. डॉ. मीनल सोहोनी यांनी ‘तणावमुक्त जीवन असे जगावे ?’ याचे प्रात्यक्षिकांसह सादरीकरण केले. तसेच कार्यक्षमता वाढवण्यासाठी मनःशांती आवश्यक असून स्वतःसाठी थोडा वेळ दिला पाहिजे. तसेच व्यायाम, प्राणायाम यांचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.