सातारा, ११ मार्च (वार्ता.) – शहरामध्ये पाणीटंचाईमुळे नागरिक त्रासले आहेतः अशातच नगर परिषदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ‘सर्वोदय हाऊसिंग सोसायटी’ला पाणीपुरवठा करणार्या एका जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे ४ महिन्यांत लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. हीच गळती वर्षभरापूर्वी पालिकेने दुरुस्त केली होती; मात्र अयोग्य पद्धतीने काम केल्यामुळे याच ठिकाणी पुन्हा गळती चालू झाली आहे.
गतवर्षी ‘सर्वोदय हाऊसिंग सोसायटी’ला पाणीपुरवठा करणार्या जलवाहिनीला गळती लागली होती. अनेक वेळा पाठपुरावा केल्यानंतर ही गळती काढण्यात आली; मात्र ४ महिन्यांपूर्वी पुन्हा गळती चालू झाली. यामुळे आतापर्यंत लाखो लिटर पाणी डोंगरात मुरले आहे. हा डोंगर आता ठिसूळ होत चालला आहे. पाणी मुरल्यामुळे जर डोंगराचा हा भाग कोसळला, तर तो याच सोसायटीतील घरांवर पडण्याची शक्यता आहे. याविषयी पाणीपुरवठा अधिकार्यांना अनेक वेळा विनंती केल्यानंतर त्यांनी कर्मचारी पाठवले; मात्र कर्मचार्यांना गळती आढळून आली नाही. पुढे नगर परिषदेकडून हीच गळती काढण्यासाठी २ पथके पाठवण्यात आली; मात्र त्यांनाही गळती आढळून आली नाही. त्यामुळे ही गळती अजूनही तशीच ठेवण्यात आली आहे. नगर परिषदेच्या पाणीपुरवठा कर्मचार्यांनी ही गळती काढण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. अन्यथा ‘सर्वोदय सोसायटीवर डोंगराचा कडा कोसळून माळीण गावाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही’, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
संपादकीय भूमिका :यासाठी उत्तरदायी कर्मचारी आणि अधिकारी यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची तत्परता नगर परिषद प्रशासन दाखवणार का ? |