‘लोकांना कुत्र्यासारखे मारा, कंबर मोडा’ अशी बोलण्याची भाषा
छत्रपती संभाजीनगर – ‘लोकांना कुत्र्यासारखे मारा. त्यांची कंबर मोडा. १ सहस्र पोलिसांच्या बंदोबस्तात ५० सहस्र लोकांना मारायला काय हरकत आहे. लाठीमार करा’, अशा शब्दांत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी १ जानेवारीच्या रात्री पोलिसांना उघडपणे लाठीमार करण्याचा आदेश दिला. आता त्यांच्या या वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद उमटत असून विरोधकांनी सत्तार हे ‘पोलिसांना आपल्या टोळीतील गुंड समजतात का ?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथे नृत्यांगना गौतमी पाटील यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ही घटना घडली.
मंत्री अब्दुल सत्तार ची आम जनतेला व कार्यकर्त्याना अश्लील,अभद्र, टपोरी शिवीगाळ. वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात खुल्या मंचावरून दाखवली स्वतःची चीर परिचित लायकी. पोलिस किंवा पार्टी कडून काही कारवाई नाही @mieknathshinde @Dev_Fadnavis pic.twitter.com/X61LEVaFan
— Sudarshan Maharashtra (@SudarshanNewsMH) January 4, 2024
१. कार्यक्रमात लोकांची मोठी गर्दी झाली होती. त्यात काही तरुणांनी हुल्लडबाजी केली. आयोजकांनी त्यांना वारंवार शांत रहाण्याच्या सूचना केल्या; पण गोंधळ संपला नाही. यामुळे सत्तार यांचा संताप अनावर झाला. त्यांनी तिथे उपस्थित पोलिसांना गोंधळ घालणार्या तरुणांवर लाठीमार करण्याचे आदेश दिले; पण हे आदेश देतांना त्यांची जीभ घसरली.
२. त्यांनी जमावाला थेट अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास प्रारंभ केला. पोलिसांचा लाठीमार चालू होताच कार्यक्रमस्थळी धावपळ उडाली.
३. अब्दुल सत्तार यांनी व्यासपिठावर जाऊन पोलिसांना मारहाणीच्या सूचना केल्या. सत्ता यांनी केलेल्या शिवीगाळीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे.
संपादकीय भूमिका :लोकप्रतिनिधींना जनता विकासकामे करण्यासाठी निवडून देते, नृत्यांगनांचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी नव्हे. नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात तरुण हुल्लडबाजी करतातच, हे ठाऊक असूनही असे कार्यक्रम ठेवायचेच कशाला ? |