सरकारसमोर पेच !
जालना – मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आता सरकारसमवेतच्या चर्चेला पूर्णविराम देण्याची घोषणा केली आहे. अंतरवाली सराटी येथे ३ जानेवारी या दिवशी मनोज जरांगे आणि मुंबई येथील मराठा आंदोलक यांच्यात बैठक पार पडली. याच बैठकीत बोलतांना मनोज जरांगे यांच्याकडून याविषयी ही घोषणा करण्यात आली. ‘मुंबईकर आणि माझ्यासह यापुढे कुणीही मराठा आंदोलक सरकारशी चर्चा करणार नाही’, असे जरांगे यांनी म्हटले आहे. जरांगे यांच्या या निर्णयामुळे आता सरकारसमोर कोंडी निर्माण झाली आहे; कारण चर्चाच बंद झाली, तर मराठा आरक्षणावर तोडगा कसा निघणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.