एकादशी माहात्‍म्‍य, व्रत आणि त्‍याची फलश्रुती !

आज ‘पंढरपूर यात्रा’ आणि ‘प्रबोधिनी एकादशी’ आहे. त्‍या निमित्ताने…

‘एकादशी हे एकच व्रत असे आहे की, जे नेहमीप्रमाणे संकल्‍प वगैरे करून विधीपूर्वक घेण्‍याची आवश्‍यकता नसते; कारण हे व्रत जन्‍मतःच लागू होते. ते आमरण घडणे इष्‍ट आहे. एकादशी व्रत हे अन्‍य व्रतांस पायाभूत असल्‍यामुळे किमान पात्रता प्राप्‍त करून घेण्‍याची इच्‍छा असणार्‍यांनी एकादशी व्रत केलेच पाहिजे. एकादशी न करता अन्‍य व्रते केल्‍यास ती फलित होण्‍यास विलंब लागतो. विशेषतः १६ सोमवार, संकष्‍टी चतुर्थी, प्रदोष, शिवरात्री, अष्‍टमी, वटसावित्री इत्‍यादी अनेक व्रते शीघ्र फलदायी होण्‍याची इच्‍छा असणार्‍यांनी एकादशी व्रत अवश्‍य करावे. एकादशीला एवढे महत्त्व प्राप्‍त होण्‍याचे कारण असे की, त्‍या तिथीला सर्व प्राणीमात्रांची गती उर्ध्‍व दिशेने झेपावते. अशा वेळी अल्‍पाहार केल्‍यास अंगी पारमार्थिक उत्‍क्रांती होण्‍याची पात्रता येऊन सत्‍यसंकल्‍प पूर्ण होण्‍यास साहाय्‍य होते. एकादशीस निराहार करून केवळ पाणी आणि सुंठसाखर खावी. हा उत्तम पक्ष. या दिवशी पोटातील सर्व अवयवांना विश्रांती मिळाल्‍यामुळे हे अधिक कार्यक्षम होतात. संपूर्ण निराहार रहाणे शक्‍य नसल्‍यास अल्‍प हविषान्‍न खाणे, हा मध्‍यम पक्ष आणि तेही अशक्‍य झाल्‍यास किमान गव्‍हासारखे एक धान्‍य खाऊन एकादशी करावी.

‘मासातील दोन्‍ही एकादशी कराव्‍यात’, असे शास्‍त्र सांगते; परंतु गृहस्‍थधर्माचे पालन करणार्‍याने किमान शुक्‍ल एकादशी अवश्‍य करावी. एकादशी व्रताची सांगता उद्यापनाने होते; परंतु तसे करूनही एकादशीला उपवास अवश्‍य करावा. एकादशी व्रत करतांना हविषान्‍न, तसेच फलाहारासमवेतच ब्रह्मचर्यपालन, देवपूजा, हरि-हरास तुळशी आणि बिल्‍वपत्र अर्पण, सत्‍यभाषण, परनिंदात्‍याग, दान या गोष्‍टी अवश्‍य कराव्‍यात. या योगे एकादशी व्रताचे फळ मिळण्‍यास साहाय्‍य होते. एकादशीच्‍या आदल्‍या दिवशी रात्री उपवास करून स्‍त्रीस्‍पर्श वर्ज्‍य करावा. उपवास शक्‍यच नसेल, तर रात्रीच्‍या पहिल्‍या प्रहरापूर्वी अल्‍पाहार करावा.

१. एकादशीचे व्रत कसे कराल ?

एकादशी व्रताला अधिक मासापासून आरंभ करू नये. ‘गुरु-शुक्राचा उदय आहे’, असे पाहून चैत्र, वैशाख, माघ किंवा मार्गशीर्ष या मासांपासून आरंभ करावा. चातुर्मास्‍य एकादशी आषाढ शुक्‍ल एकादशीपासून प्रारंभ करून शुक्‍ल एकादशीस समाप्‍त करावी. नेहमी श्रद्धा भक्‍तीयुक्‍त राहून सदाचारपूर्वक व्रताचार करावा. व्रताच्‍या ३ दिवसांत (दशमी, एकादशी आणि द्वादशी) काश्‍याचे भांडे, मसूर, चणे, असत्‍य भाषण, शाक, मध, तेल, मैथुन, द्युतक्रिडा आणि अती जलपान करू नये. व्रताच्‍या पहिल्‍या दिवशी (दशमी) आणि दुसर्‍या दिवशी (द्वादशी) केवळ एक वेळ हविषान्‍न (जव, गहू, मूग, सैंधव, काळी मिरची, साखर आणि गायीचे दूध) सेवन करावे.

दशमीच्‍या दिवशी रात्री एकादशी व्रताचे स्‍मरण ठेवावे आणि एकादशीच्‍या दिवशी सकाळी स्नानादि कर्मे उरकून ‘मम कायिक वाचिक मानसिक सांसर्गिक पातकोपपातक दुरितक्षयपूर्वक श्रुतिस्‍मृतिपुराणोक्‍त-फलप्राप्‍त्‍यर्थं श्रीपरमेश्‍वरप्रीतिकामनया एकादशीव्रतमहं करिष्‍ये ।’ म्‍हणजे ‘माझे कायिक, वाचिक, मानसिक, सांसर्गिक पातके, उपपातके आणि दुरितकर्मे नष्‍ट होण्‍यासाठी श्रुति, स्‍मृति अन् पुराणे यांत सांगितलेले फळ प्राप्‍त होण्‍यासाठी आणि परमेश्‍वराची कृपा प्राप्‍त होण्‍यासाठी मी एकादशी व्रत करतो’, असा संकल्‍प करून जितेंद्रिय होऊन श्रद्धा, भक्‍तीयुक्‍त मनाने आणि यथाविधी देवतेचे पूजन करावे. गंध, पुष्‍प, धूप, नैवेद्य दाखवून पूजा करावी आणि

एकादश्‍यां निराहारः स्‍थित्‍वाद्याहं परेऽहनि ।
भोक्ष्यामि पुण्‍डरीकाक्ष शरणं मे भवाच्‍युत ॥

– नारदपुराण, पूर्वखण्‍ड, अध्‍याय २३, श्‍लोक १५

अर्थ : हे कमलनयन भगवान अच्‍युता, मी एकादशीच्‍या दिवशी निराहार राहून द्वादशीला अन्‍न प्राशन करतो. मी तुला शरण आलो आहे.

हा मंत्र म्‍हणावा. एकादशीच्‍या दिवशी भोजन करू नये. इंद्रिय निग्रह करावा. विष्‍णुमूर्तीसमोर भूमीवर बसून भजने, गीत गायन करावे, तसेच नृत्‍य, संगीत इत्‍यादी कार्यक्रम करून जागरण करावे किंवा पुराणात वर्णिलेल्‍या विष्‍णुगाथेचे श्रवण करावे. द्वादशीस स्नान करून विष्‍णुमूर्तीस दुग्‍धस्नान घालून पुढील प्रार्थना म्‍हणावी.

अज्ञानतिमिरान्‍धस्‍य व्रतेनानेन केशव ।
प्रसीद सुमुखो भूत्‍वा ज्ञानदृष्‍टिप्रदो भव ॥

– नारदपुराण, पूर्वखण्‍ड, अध्‍याय २३, श्‍लोक २०

अर्थ : हे केशवा, अज्ञानरूपी अंधारात अंध झालेल्‍या माझ्‍यावर या व्रताने प्रसन्‍न होऊन मला ज्ञानदृष्‍टी प्रदान कर.

मग आरती करावी. तद़्‍नंतर जप, हवन, स्‍तोत्रपठण, तसेच सुरस गायन, वादन, नृत्‍य इत्‍यादी विविध कार्यक्रम करून प्रदक्षिणा आणि नमस्‍कार करावा. अशा तर्‍हेने दिवसाचा वेळ भगवद़्‍चिंतनात आणि सेवेत घालवावा अन् रात्री कथाश्रवण, स्‍तोत्रपठण, भजन इ. कार्यक्रम करून जागर करावा. यानंतर ब्राह्मणांना भोजन आणि दक्षिणा देऊन निरोप द्यावा. नंतर आन्हिक, पंचयज्ञ करावे. व्रताने शरीर आणि मन यांनी पवित्र असावे. मनावर नियंत्रण ठेवावे. एकादशीचे व्रत वयाच्‍या ८० व्‍या वर्षांपर्यंत करणे आवश्‍यक असते. तथापि दुर्बलतेमुळे तसे करणे शक्‍य नसेल, तर व्रताचे उद्यापन करून त्‍याची समाप्‍ती करावी.

२. एकादशीचे फळ

सर्व धर्मांचे अंतिम उद्दिष्‍ट चंचल मन स्‍थिर करणे, हे आहे. मन संयमी बनल्‍यावर सर्व इंद्रिये आपोआप स्‍वतःच्‍या अधीन रहातील. पद्मपुराणात एकादशीच्‍या उपवासाचे फळ पुढीलप्रमाणे सांगितले आहे –

अश्‍वमेध सहस्‍त्राणि राजसूय शतानि च ।
एकादश्‍युपवासस्‍य कलां नार्हन्‍ति षोडशीम् ।

– पद्मपुराण, स्‍वर्गखण्‍ड, अध्‍याय ३१, श्‍लोक १५५ आणि १५६

अर्थ : सहस्रो अश्‍वमेध आणि शेकडो राजसूय यज्ञ यांना एकादशी उपवासाच्‍या सोळाव्‍या कलेइतकेही महत्त्व नाही.

स्‍वर्गमोक्षप्रदाह्येषा शरीरारोग्‍यदायिनी ।

– पद्मपुराण, स्‍वर्गखण्‍ड, अध्‍याय ३१, श्‍लोक १५८

अर्थ : एकादशी ही स्‍वर्ग, मोक्ष आणि आरोग्‍यदायिनी आहे.

सुकलत्रप्रदाह्येषा जीवत्‍पुत्रप्रदायिनी ।
न गङ्‍गा न गयावैश्‍य न काशी न च पुष्‍करम् ॥

– पद़्‍मपुराण, स्‍वर्गखण्‍ड, अध्‍याय ३१, श्‍लोक १५६

न चापि वैष्‍णवक्षेत्रं तुल्‍यं हरिदिनेन तु ।
यमुना चन्‍द्रभागा न तुल्‍या हरिदिनेन तु ॥

– पद़्‍मपुराण, स्‍वर्गखण्‍ड, अध्‍याय ३१, श्‍लोक १६०

अर्थ : (एकादशीचे व्रत) चांगली भार्या (पत्नी) आणि पुत्र देणारे आहे. गंगा, गया, काशी, पुष्‍कर, वैष्‍णव क्षेत्र, यमुना आणि चंद्रभागा यांपैकी कुणासही एकादशीची बरोबरी करता येणार नाही.

अनायासेन येनात्र प्राप्‍यते वैष्‍णवं पदम् ।

– पद़्‍मपुराण, स्‍वर्गखण्‍ड, अध्‍याय ३१, श्‍लोक १६१

अर्थ : एकादशीच्‍या दिवशी उपवास केल्‍यास वैष्‍णवपद सहजपणे प्राप्‍त होते.

एकादशीच्‍या नावाच्‍या श्रवणाने यमदूतही शंकित होतात. सर्व व्रतांत श्रेष्‍ठ शुभ एकादशी दिवशी उपवास करून विष्‍णूला प्रसन्‍न करण्‍यासाठी रात्रभर जागरण करावे आणि त्‍यासाठी त्‍याचे मंदिर सुशोभित करावे. तुलसीदलाने श्रीहरीची पूजा केल्‍याने शेकडो यज्ञांचे फळ मिळते.

ब्रह्मदेवाने कुबेराला एकादशी दिली. एकादशीला जो संयमित रहातो, शुद्धाचरण करतो आणि न शिजवलेले अन्‍न खातो, त्‍यावर कुबेर प्रसन्‍न होऊन त्‍याला सर्व काही देतो. गरुडपुराणात असे सांगितले आहे की, एका पारड्यात संपूर्ण पृथ्‍वीचे दान आणि दुसर्‍या पारड्यात एकादशी असता तुलनेने एकादशी महापुण्‍यवान किंवा श्रेष्‍ठ ठरते.

३. ‘स्‍मार्त’ आणि ‘भागवत’ एकादशी यांविषयीची माहिती

शुक्‍ल आणि कृष्‍ण पक्षातील एकादशी तिथी हिला ‘हरिदिनी’, असेही म्‍हणतात. ही विष्‍णुची तिथी मानली आहे. हे व्रत शुक्‍ल आणि कृष्‍ण अशा दोन्‍हीही एकादशींना करतात. एकादशीत ‘स्‍मार्त’ आणि ‘भागवत’ असे दोन भेद आहेत. ज्‍या पक्षात हे २ भेद संभवतील, त्‍या वेळी पंचांगात पहिल्‍या दिवशी ‘स्‍मार्त’ आणि दुसर्‍या दिवशी ‘भागवत’ असे लिहिलेले असते. ‘स्‍मार्त’ आणि ‘वैष्‍णव’ असा भेद करण्‍याची वास्‍तविक आवश्‍यकता नाही; कारण जो सर्व प्राणीमात्र सारखेच मानतो, तो आपल्‍या आचारात मग्‍न असतो. जो प्रत्‍येक कार्य विष्‍णु आणि शिव यांना अर्पण करतो, तोच वैष्‍णव अन् शैव. दोघांचा आचार एकच असल्‍यामुळे भेद रहातच नाही आणि म्‍हणूनच शास्‍त्रात एकादशीला अनन्‍य साधारण महत्त्व आहे.

४. संत ‘विष्‍णुदास नामा’चे ‘एकादशी महात्‍म्‍य’

मराठी संतांनी आपल्‍या अभंगपदाच्‍या स्‍फुट रचनांमध्‍ये वैष्‍णवांच्‍या आचारधर्माचा पुरस्‍कार करतांना जसा वारंवार एकादशीचा महिमा गायला आहे, तसाच काही संतकवींनी एकादशी महात्‍म्‍यात स्‍वतंत्र ग्रंथरचना करूनही गायला आहे. ‘एकादशी महात्‍म्‍य’ हे अशा रचनांपैकी अत्‍यंत लोकप्रिय असून, त्‍याची रचना ‘विष्‍णुदास नामा’ या संतकवीने केलेली आहे. संत विष्‍णुदास नामा हे संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वरकालीन प्रख्‍यात संत नामदेव यांच्‍याहून वेगळे आहेत. ते या आद्य संत नामदेवांच्‍या नंतर (१४ व्‍या शतकात) होऊन गेले. त्‍यांचे ‘एकादशी महात्‍म्‍य’ अवघे १८८ ओव्‍यांचे आहे.

महाभारत काळात पांडवांचे गोत्रवधाचे पातक दूर व्‍हावे; म्‍हणून द्रौपदीने श्रीकृष्‍णास उपाय विचारला आणि त्‍याने आपल्‍या भक्‍तीसंपन्‍न मानस भगिनीस गोत्रवध पातकाच्‍या निरसनार्थ एकादशी व्रताचा महिमा सांगितला. या भूमिकेतून संत विष्‍णुदास नामा यांनी हे ‘एकादशी महात्‍म्‍य’ रचले. महात्‍म्‍य कथा सांगून झाल्‍यावर ‘हे व्रत आचरावे कवणे परी’ या प्रश्‍नाचे उत्तर देतांना व्रताचरणाचे स्‍वरूपही स्‍पष्‍ट केले आहे. या महात्‍म्‍याचे आणखी एक विशेष हे आहे की, त्‍यात स्‍मार्त आणि भागवत एकादशीचा भेद स्‍पष्‍ट करण्‍याच्‍या निमित्ताने हरि-हर ऐक्‍याची भावना दृढ केली आहे.

जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज यांनीही एकादशीसमवेत सोमवारच्‍या व्रताचा आणि हरिसमवेत हरालाही वात लावण्‍याचा पुरस्‍कार याच समन्‍वयाच्‍या भावनेतून केला आहे.

एकादशी सोमवार न करिती । कोण त्‍यांची गति होईल नेणें ॥
हरिहरा नाहीं बोटभरी वाती । कोण त्‍यांची गति होईल नेणो ॥

– संत तुकाराम महाराज

ही समन्‍वयाची भावना आणि व्रताचरणातील अंतःशुद्धीचा आग्रह, ही मराठी परंपरेची अनन्‍यसाधारण वैशिष्‍ट्ये आहेत. स्‍कंदपुराणाच्‍या संबंधित ‘भीमा महात्‍म्‍य’ नामक संस्‍कृत ग्रंथात (अध्‍याय ४) आषाढी-कार्तिकी एकादशीचा महिमा श्रीक्षेत्र पंढरपूर आणि श्रीविठ्ठल यांच्‍या संदर्भात सांगितला आहे.’

– पं. आनंद घनराम

(साभार : मासिक ‘धनुर्धारी’, जुलै २००८)