तेलगी मुद्रांक घोटाळा प्रकरण
जळगाव – तेलगी मुद्रांक घोटाळ्यानंतर विक्री थांबवलेले राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालये आणि प्रधान मुद्रांक कार्यालयात पडून असलेले अन् वापरायोग्य नसलेले एकूण ३ सहस्र ३९ कोटी रुपये दर्शनीमूल्य, तसेच ७ कोटी ५० लाख रुपयांहून अधिक छपाई व्यय असलेले तब्बल ९.२४ कोटी मुद्रांक नष्ट करण्यात येणार आहेत. त्यांचे एकत्रित वजन ६५० टनांहून अधिक आहे. ते नष्ट कसे करावे, या संदर्भात शासनाकडून सविस्तर मार्गदर्शक सूचनाही लागू करण्यात आल्या आहेत.
१. गेल्या अनेक वर्षांपासून कोषागार कार्यालयांमध्ये पडून असलेले मुद्रांक नष्ट करण्यासाठी सर्व जिल्ह्यांच्या मुद्रांक जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.
२. मुद्रांक नष्ट केल्यानंतर त्यातील एखादा स्टँप पेपर किंवा त्याचे लेबल आढळून आले किंवा त्याचा अपवापर झाल्याचे समोर आले, तर समितीचे अध्यक्ष आणि सचिव यांच्यावर थेट फौजदारी कारवाई करण्याची चेतावणी या संदर्भात लागू करण्यात आलेल्या परिपत्रकात देण्यात आली आहे.
३. पुणे येथील नोंदणी महानिरीक्षक अन् मुद्रांक नियंत्रक यांनी १२ एप्रिल २०२३ या दिवशी शासनाला पत्र पाठवले होते. शिल्लक असलेल्या जुन्या मुद्रांकांद्वारे भविष्यात अपहार होण्याची किंवा त्यांचा अपवापर होण्याची शक्यता त्यात व्यक्त करण्यात आली होती.
४. महसूल विभागाने ३ नोव्हेंबर या दिवशी या प्रस्तावाला मान्यता दिली. त्या कामासाठी नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक यांनाच सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.
५. तेलगी घोटाळ्यानंतर शासनाने कोषागारातील शिल्लक असलेले विना क्रमांकाचे स्टँप पेपर विक्री न करण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून हे मुद्रांक पडून आहेत. या घोटाळ्यानंतर प्रत्येक मुद्रांकाला क्रमांक देण्यात येत आहेत, तसेच मुद्रांकाचे डिझाइनही पालटण्यात आले आहे.
६. राज्यात कोणत्या व्यक्तीला मुद्रांक विक्री झाली, याची नोंदणी मुद्रांक विभाग ठेवत आहे.
७. विक्रीयोग्य नसलेल्या मुद्रांकांची सूची करणार असून त्यावर समितीच्या सर्व सदस्यांची नावे, पदनाम आणि शिक्क्यासह निळ्या शाईच्या लेखणीने स्वाक्षरी करण्यात येणार आहे.
८. प्रत्येक मुद्रांकाचे कटींगद्वारे बारीक तुकडे करून ते जाळून नष्ट करण्यात येतील. या प्रक्रियेचे ध्वनीचित्रीकरण करून अहवाल नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रण कार्यालयात कायमस्वरूपी जतन करून ठेवण्यात येणार आहे. एकही मुद्रांक शिल्लक रहाणार नाही, याविषयी दक्षता घेण्याचे आदेश अधिकार्यांना देण्यात आले आहेत.