यापुढे बडव्‍यांची अपकीर्ती करण्‍याचा प्रयत्न केल्‍यास त्‍याच भाषेत उत्तर देऊ !

बडवे समाजाची राजकीय नेत्‍यांना चेतावणी

प्रतिकात्मक चित्र

पंढरपूर (जिल्‍हा सोलापूर) – सध्‍या राजकीय घडामोडींविषयी स्‍पष्‍टीकरण देतांना छगन भुजबळ यांनी म्‍हटले की, ‘पवारांना बडव्‍यांनी घेरले होते; म्‍हणून आम्‍ही बाहेर पडलो.’ भुजबळ यांच्‍या वक्‍तव्‍याने समस्‍त बडवे समाज संतप्‍त झाला असून या राजकीय घडामोडींशी बडवे आणि श्री विठ्ठल यांचा कसलाही संबंध नाही. या माध्‍यमातून बडव्‍यांना अपकीर्त करण्‍याचे काम चालू आहे. त्‍यामुळे बडव्‍यांना अपकीर्त करण्‍याचे षड्‍यंत्र सर्वच राजकीय पक्षांनी तात्‍काळ थांबवावे. यापुढे श्री विठ्ठल आणि बडवे यांचे उदाहरण कुणी देतांना आढळल्‍यास त्‍या राजकीय पक्षाला, तसेच संबंधित नेत्‍यांना आम्‍ही त्‍याच भाषेत उत्तर देऊ, अशी चेतावणी बडवे समाजाने दिली आहे. याविषयी बडवे समाजातील युवकांची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्‍यात आला.

सहस्रो वर्षे श्री विठ्ठलाची सेवा करणार्‍या बडवे कुटुंबियांचा अवमान थांबवा ! – महंत सुधीरदास महाराज यांचे आवाहन

बडवे कुटुंबियांनी पंढरपूरच्‍या श्री विठ्ठलाची मागील सहस्रो वर्षे अविरत सेवा केली आहे. त्‍यामुळे त्‍यांचा अवमान थांबवा, असे आवाहन नाशिक येथील काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास महाराज यांनी केले आहे. महंत सुधीरदास यांनी म्‍हटले आहे की, श्री विठ्ठल मंदिरात आज पुजारी म्‍हणून कुणीही बडवे नाहीत; मात्र मागील सहस्रो वर्षे ज्‍यांनी विठ्ठलाचे पूजन केले, विठ्ठलाची मूर्ती सांभाळली, अफझलखानाच्‍या आक्रमणाच्‍या वेळी याच बडवे कुटुंबियांनी विठ्ठलाच्‍या मूर्तीचे संरक्षण केले. त्‍या कुटुंबाविषयी असे अवमानकारक उद़्‍गार काढणे योग्‍य नाही. छगन भुजबळ, उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांसमवेतच राज ठाकरे यांनी वारंवार हा शब्‍दप्रयोग केला आहे. हा शब्‍दप्रयोग थांबवावा.