स्त्रियांनाही आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत होण्यासाठी समान संधी ! – सौ. श्वेता शॉन क्लार्क, फोंडा, गोवा

  • ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने थायलंडमधील आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘अध्यात्म महिला नेत्यांना कसे सक्षम बनवते’, या विषयावर ‘ऑनलाईन’ शोधनिबंध सादर !

  • महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे शोधनिबंधाचे लेखक, तर श्री. शॉन क्लार्क आणि सौ. श्वेता क्लार्क आहेत सहलेखक !

सौ. श्वेता क्लार्क

फोंडा (गोवा) – चांगले किंवा वाईट व्यक्तिमत्त्व हे आपल्या जीवनातील आध्यात्मिक पैलूंशी संबंधित असते. उच्च आध्यात्मिक पातळी असलेला, म्हणजेच चांगली साधना करणारा नेता हा नि:स्वार्थी असतो आणि तो समाजाच्या भल्यासाठी कार्य करतो. याउलट ज्याची आध्यात्मिक पातळी अल्प असते, म्हणजेच साधना न करणारा नेता इतरांविषयी अल्प विचार करतो. स्त्री असो वा पुरुष बहुतेक नेते साधना करत नाहीत. त्यामुळे ते नकारात्मकतेने लवकर प्रभावित होतात. परिणामी त्यांच्या कृती आणि निर्णय यांचा समाजावर वाईट परिणाम होतो. आध्यात्मिक साधना केल्याने स्त्री आणि पुरुष या दोघांनाही आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत होण्यासाठी अन् खर्‍या अर्थाने नेते बनण्यासाठी सम प्रमाणात साहाय्य होते, असे उद्गार ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या सौ. श्वेता क्लार्क यांनी केले. बँकॉक, थायलंड येथे ‘टुमारो पिपल’ या संघटनेने आयोजित केलेल्या ‘१४ व्या महिला नेतृत्व आणि सक्षमीकरण परिषद, २०२३’ (डब्ल्यु.एल्.ई.सी. २०२३) या ‘ऑनलाईन’ आंतरराष्ट्रीय परिषदेत त्या बोलत होत्या.

या परिषदेत सौ. श्वेता क्लार्क यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘अध्यात्म महिला नेत्यांना कसे सक्षम बनवते’, या विषयावर शोधनिबंध सादर केला. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक, तर विश्वविद्यालयाच्या संशोधन गटातील सदस्य श्री. शॉन क्लार्क (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) आणि सौ. श्वेता क्लार्क या सहलेखक आहेत.

या वेळी सौ. श्वेता क्लार्क पुढे म्हणाल्या की,

१. उच्च आध्यात्मिक पातळी असलेले स्त्री-पुरुष आणि अल्प आध्यात्मिक पातळी असलेले स्त्री-पुरुष अशा दोन गटांची ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (यू.ए.एस्.)द्वारे चाचणी घेण्यात आली. उच्च आध्यात्मिक पातळी असलेल्या स्त्री-पुरुषांमध्ये सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ पुष्कळ प्रमाणात, तर अल्प आध्यात्मिक पातळी असलेल्या स्त्री-पुरुषांमध्ये नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ आढळून आली.

२. अन्य एका चाचणीमध्ये असे आढळून आले की, केवळ ३० मिनिटे नामजप केल्यावर स्त्री-पुरुषांमधील नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ लक्षणीयरित्या न्यून झाली.

३. खर्‍या अर्थाने नेता बनण्यासाठी प्रत्येकाने आपले स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून आध्यात्मिकदृष्ट्या सात्त्विक जीवन जगण्यावर भर देणे महत्त्वाचे आहे.