मुंबई, १२ एप्रिल (वार्ता.) – आधुनिक औषधे उपलब्ध नसतांना भारतात वनस्पतींद्वारे होत असलेले परंपरागत औषधोपचार औषधी वनस्पती नष्ट झाल्यामुळे बंद झाले आहेत. अशा दुर्मिळ औषधी वनस्पतींची महाराष्ट्रात पुन्हा लागवड करण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ७५ शहरांमध्ये वनविभागाकडून दुर्मिळ औषधी वनस्पती असलेल्या ‘अमृत वन उद्यानां’ची निर्मिती करण्यात येणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून जनहितकारी योजना राबवली जाणार आहे.
मोठे वृक्ष, वेली आणि झुडपे या प्रकारांतील औषधी वनस्पती, दशमूळ वनस्पती, दुर्मिळ प्रजाती आणि काही प्रमुख वृक्ष यांची अमृत वन उद्यानासाठी निवड केली जाणार आहे. वनविभागाकडून या वृक्षांची लागवड केली जाणार आहे. मार्च २०३० पर्यंत या योजनेचा कालावधी असणार आहे. त्यानंतर ही उद्याने स्थानिक स्वराज्य संस्था, सेवाभावी संस्था, महामंडळे आदींकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत.