सनातनचे ३२ वे संत पू. सौरभ जोशी (वय २७ वर्षे) यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रतीचा उच्च कोटीचा शिष्यभाव !

पू. सौरभ संजय जोशी यांना २७ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

चैत्र कृष्ण अष्टमी (१३.४.२०२३) या दिवशी सनातनचे ३२ वे संत पू. सौरभ संजय जोशी यांचा २७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचे वडील श्री. संजय जोशी यांना जाणवलेली पू. सौरभदादांमधील शिष्यभाव दर्शवणारी उदाहरणे पुढे दिली आहेत.

पू. सौरभ जोशी
श्री. संजय जोशी

‘५.२.२०२३ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मधील ‘चरणसेवा आणि तपश्चर्या यांतील भेद समजणारे सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ४ वर्षे) !’, हा लेख मी वाचला. तेव्हा मला ‘संतांचा गुरूंप्रती असणारा भाव सारखाच असतो’, असे वाटले. ‘संत दिसती वेगळाले, परी ते स्वरूपी मिळाले’, या वचनाची मला आठवण झाली आणि पू. सौरभ जोशी (सनातनचे ३२ वे संत, वय २६ वर्षे) यांच्या संदर्भातील प्रसंग आठवले. यातून ‘संतांचे मार्ग वेगळे असले, तरी अंतिमतः त्यांच्यातील गुरूंप्रतीचा शरणागतभाव, लीनता इत्यादी गुण सारखेच असतात; मात्र ते वेगवेगळ्या प्रसंगांतून आणि वेगवेगळ्या पद्धतींनी व्यक्त होत असतात’, याची मला जाणीव झाली.

 १. पू. सौरभदादांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती उच्च कोटीचा शिष्यभाव असल्याने त्यांनी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चेहर्‍याकडे न बघणे 

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात असतांना गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) पू. सौरभदादांना कधी कधी भेटायला यायचे. ते जेव्हा यायचे, तेव्हा पू. सौरभदादांनी त्यांच्याकडे कधीच पाहिले नाही. ते बघत नाहीत; म्हणून गुरुमाऊली पू. दादांचा चेहरा ज्या दिशेला असेल, तिकडे जाऊन ‘पू. दादा त्यांच्याकडे बघतात का ?’, हे पहायचे; मात्र गुरुमाऊली दुसर्‍या दिशेला गेली की, पू. सौरभदादा स्वतःचा चेहरा त्वरित अन्यत्र फिरवायचे. असे काही वेळा झाल्यानंतर मलाही प्रश्न पडला, ‘पू. सौरभदादा गुरुमाऊलींकडे का बघत नसावेत ?’ एकदा मी हा प्रश्न सनातन संस्थेचे ११ वे संत पू. संदीप आळशी यांना विचारला असता ते म्हणाले, ‘‘उच्च कोटीचा शिष्यभाव असलेला साधक गुरूंच्या मुखकमलाकडे कधीच पहात नाही. त्याची दृष्टी नेहमी गुरूंच्या चरणांकडे असते.’’ पू. सौरभदादांचेही तसेच आहे. विकलांग असल्याने ते बसू शकत नाहीत किंवा उभेही राहू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना गुरुमाऊलींच्या चरणांकडे दृष्टी ठेवता येत नाही. त्यामुळे गुरुमाऊली जेथे असतील, त्याच्या विरुद्ध बाजूला ते बघतात. यातून त्यांचा गुरूंप्रती असलेला उच्च कोटीचा शिष्यभाव, शरणागतभाव आणि लीनता लक्षात येते.

२. पू. सौरभदादांनी ‘मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा केवळ साधक आहे’, असे सांगणे

रामनाथी आश्रमात असतांना पू. सौरभदादांच्या सेवेसाठी काही साधक यायचे. एकदा एक साधक पू. दादांना उद्देशून म्हणाला, ‘‘आमचे पू. दादा ‘सद्गुरु’च आहेत. केवळ गुरुमाऊलींनी तसे घोषित करणे शेष आहे.’’ त्याविषयी माझ्यात आणि पू. दादांमध्ये पुढील संभाषण झाले.

मी : पू. दादा, तुम्ही सद्गुरु आहात का ?

पू. दादा : नाही !

मी : तुम्ही ‘श्रीं’चे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) शिष्य आहात का ?

पू. दादा : नाही !

मी : तुम्ही ‘श्रीं’चे साधक आहात का ?

पू. दादा : हो !

पू. सौरभदादांच्या वरील उत्तरावरून माझ्या लक्षात आले, ‘आम्हाला जरा काही येऊ लागले की, आमचा अहंभाव जागृत होतो. तो बोलण्यातून आणि कृतीतून व्यक्त होतो; मात्र पू. दादा आध्यात्मिकदृष्ट्या उच्च स्थितीला असूनही त्यांच्यात पराकोटीची विनम्रता आहे.’

‘गुरुमाऊली, केवळ तुमच्याच कृपेने मला पू. सौरभदादांची सेवा करता आली. या सेवेतून संतत्वाचे विविध पैलू तुम्हीच माझ्या लक्षात आणून दिले. पू. सौरभदादा त्यांच्यातील भाव इतरांसारखे शब्दांतून व्यक्त करू शकत नाहीत; मात्र ‘मी त्यांची सेवा करत असतांना विविध प्रसंगांतून तुम्ही तो लक्षात आणून देता’, याबद्दल मी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘आम्हा साधकांमध्येही असा शरणागतभाव आणि लीनता निर्माण होऊ द्या’, अशी आपल्या सुकोमल चरणी प्रार्थना आहे.’

– श्री. संजय जोशी (पू. सौरभ जोशी यांचे वडील), पिंगुळी, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (५.२.२०२३)