पुणे – येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति मंदिरामध्ये चांदीच्या मूर्तीवर १२ फेब्रुवारी या दिवशी सूर्यकिरणांचा अभिषेक झाला आणि ‘जय गणेश’च्या जयघोषात भाविकांनी किरणोत्सव अनुभवला. किरणोत्सव सोहळ्याच्या तिसर्या दिवशी दगडूशेठ गणपति मंदिराच्या गाभार्यात सूर्यकिरणांनी प्रवेश केला. प्रतिवर्षी माघी गणेश जन्मानंतरच्या उत्तरायणामध्ये सूर्यकिरणे गणरायाच्या मूर्तीवर पडतात. हा प्रकाश रिद्धी-सिद्धीच्या मूर्तीवरही पडला. ८ वाजून १८ मिनिटे ते ८ वाजून २३ मिनिटांपर्यंत हा किरणोत्सव भाविकांना पहाता आला. मंदिराची रचना पूर्वाभिमुख आणि उंच असल्याने माघ मासात गाभार्यामध्ये सूर्यकिरणांचा प्रवेश होतो, असे ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सांगितले.