धर्मप्रेमींच्या घोषणांमुळे वातावरण उत्साहवर्धक !
मुंबई, १० फेब्रुवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पनवेल येथे १२ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ५ वाजता ‘दि मिडल क्लास को-ऑप. हाऊसिंग सोसायटी’च्या पटांगणात ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या प्रसारासाठी आणि जनजागृतीसाठी १० फेब्रुवारी या दिवशी वाहनफेरी काढण्यात आली. ४० हून अधिक दुचाकी वाहनांनी वाहनफेरीत सहभाग घेतला.
या वाहनफेरीला हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. फेरीत असणारे भगवे ध्वज, धर्माभिमानी हिंदूंनी परिधान केलेले भगवे फेटे, फेरीत देण्यात आलेल्या हिंदुत्व जागृत करणार्या घोषणा यांमुळे अवघा परिसर हिंदुत्वाच्या प्रेरणांनी उत्साहवर्धीत झाला. या वेळी ध्वनीक्षेपकावरून हिंदु राष्ट्र-जागृती सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात येत होते.
फेरीचा प्रारंभ शंखनाद करून झाला. त्यानंतर हिंदु धर्माचे प्रतीक असणार्या धर्मध्वजाचे पूजन जुना आखाड्याचे पूजनीय भैरवसिंग यांच्या हस्ते करण्यात आले. ह.भ.प. संजय महाराज यांनी धर्मध्वजाला पुष्पहार अर्पण केला, तसेच त्यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. यानंतर सीकेटी शाळेच्या मार्गाने निघालेल्या फेरीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाला. फेरीच्या समारोपप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम यांनी उपस्थितांना संबोधित करून 12 फेब्रुवारी या दिवशी होत असलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन केले.
या फेरीमध्ये वारकरी संप्रदाय, जुना आखाडा आदी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आदींनी सहभाग घेत सभा यशस्वी करण्याचा निर्धार केला.
ओवळे (पनवेल) येथील दुर्ग भ्रमंती ग्रुप आणि विश्व हिंदु परिषद या संघटनांचे कार्यकर्ते या फेरीत सहभागी झाले होते.
या वाहनफेरीला सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु अनुराधा वाडेकर, सनातन संस्थेच्या संत पू. (सौ.) संगीता जाधव यांची वंदनीय उपस्थिती लाभली. |