ध्वनीप्रदूषणावरून सनबर्नच्या विरोधात फौजदारी स्वरूपाची कारवाई ! – प्रदूषण नियंत्रण मंडळाने न्यायालयाला दिली माहिती

पणजी, २४ जानेवारी (वार्ता.) – वागातोर येथे २८ ते ३० डिसेंबर २०२२ या कालावधीत झालेल्या ‘सनबर्न’ महोत्सवात ध्वनीप्रदूषण झाल्याची माहिती गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे. या प्रकरणी ‘सनबर्न’च्या आयोजकांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची तक्रार म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयात केल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाने २४ जानेवारी या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाला दिली.

‘सनबर्न’ महोत्सवाच्या वेळी ५५ डेसिबल्स आवाजाचे प्रमाण ओलांडून ९० डेसिबलपर्यंत कर्कश आवाजात संगीत चालू ठेवल्याने ध्वनीप्रदूषण झाल्याची तक्रार देऊनही कारवाई न झाल्याने एका नागरिकाने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात जनहित याचिका प्रविष्ट केली आहे. ध्वनीप्रदूषणाच्या प्रकरणी पोलीस, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि उपजिल्हाधिकारी या अधिकार्‍यांनी कोणतीच पावले न उचलल्याने गोवा खंडपिठाने या तिन्ही यंत्रणांना फैलावर घेतले होते. यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ही कारवाई होत आहे. (न्यायालयाने फैलावर घेतल्यावर कारवाई करणारे निष्क्रीय वृत्तीचे नव्हे, तर स्वतःहून प्रदूषणाच्या विरोधात कारवाई करणारे तत्त्वनिष्ठ अधिकारी असलेले प्रदूषण नियंत्रण मंडळ हवे ! – संपादक) गोवा खंडपिठाने महोत्सवाच्या आयोजकांवर फौजदारी कारवाई कधी करणार ? अशी विचारणा करत मंडळाची बैठक घेऊन कायदेशीर प्रक्रिया चालू करण्याचे निर्देश सरकारी यंत्रणांना दिले होते. यानंतर मंडळाने बैठक घेऊन मंडळाच्या सदस्य सचिवांना न्यायालयात फौजदारी तक्रार प्रविष्ट करण्याचे अधिकार दिले आणि मंडळाने म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात तक्रार प्रविष्ट केली.

ध्वनीप्रदूषण प्रकरणी अहवाल सुपुर्द करण्यासाठी ४ आठवड्यांचा अवधी मागितला

‘सनबर्न’ महोत्सवात ध्वनीप्रदूषण झाल्याच्या प्रकरणी अहवाल सुपुर्द करण्यास गोवा शासनाने ४ आठवड्यांचा अवधी मागितला आहे. या प्रकरणी आता फेब्रुवारी मासाच्या तिसर्‍या आठवड्यात पुढील सुनावणी होणार आहे.