‘तारागिरी’ या युद्धनौकेचे मुंबई येथील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. येथे जलावतरण !

मुंबई, १२ सप्टेंबर (वार्ता.) – तारागिरी या युद्धनौकेचे ११ सप्टेंबर या दिवशी मुंबई येथील ‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.’ येथे जलावतरण करण्यात आले. नौदलाच्या पश्चिमी कमानचे इन चीफ फ्लॅग ऑफिसर व्हाईस ऍडमिरल अजेंद्र बहादूर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्चिमी क्षेत्राच्या अध्यक्षा एन्डब्ल्यूडब्ल्यूए श्रीमती चारूसिंह यांच्या हस्ते जलावतरण करण्यात आले.

१. पी १७ ए या प्रकल्पाच्या अंतर्गत ‘तारागिरी’ या युद्धनौकेची बांधणी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. येथे करण्यात आली आहे. नीलगिरी श्रेणीतील ही तिसरी युद्धनौका आहे.

२. या श्रेणीतील सर्व युद्धनौकांचे रेखांकन स्वदेशी असून, बचावासाठी, निरीक्षणासाठी तसेच गतिशीलतेसाठी त्यामध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत.

३. ‘तारागिरी’ या युद्धनौकेचे वजन ३ सहस्र ५१० टन इतके असून तिची लांबी १४९ मीटर इतकी आहे. तिचा वेग २८ नॉट्स (सुमारे ५२ किमी प्रतितास) इतका आहे. ताशी ५९ किमी वेगाने समुद्राच्या लाटांना भेदून धावण्याची या युद्धनौकेची क्षमता आहे.

४. शत्रूच्या नजरेत न येण्यासाठी अद्ययावत् तंत्राचा वापर करण्यात आला असून या युद्धनौकेचा वेध घेणे सहज साध्य होणार नाही.

५. पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणार्‍या ‘सुपरसॉनिक’ क्षेपणास्त्र प्रणालीने ही युद्धनौका सिद्ध असणार आहे. जलावतरणानंतर या युद्धनौकेवर शस्त्रे चढवण्यात येतात आणि समुद्रात सर्व प्रकारच्या चाचण्या घेतल्या जातात. त्यानंतर युद्धनौका नौदलात भरती केली जाते.