पुणे – ‘रूपी बँके’त फेब्रुवारी २००२ मध्ये तत्कालीन संचालक मंडळ, काही अधिकारी आणि कर्मचारी यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उघड झाले. त्यांच्यावर १ सहस्र ४९० कोटी रुपयांचे दायित्व निश्चित करण्यात आले आहे. संचालकांच्या जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव केला, तरी केवळ १०० कोटी रुपये वसूल होतील. त्यामुळे ५ लाखांवरील ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळणार कि नाहीत, अशी शंका येत आहे.
‘रूपी बँके’तील गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर प्रशासकाद्वारे बँकेचे कामकाज चालू होते. वर्ष २०१३ मध्ये निर्बंध घातले. तत्कालिन १५ संचालकांसह इतर अधिकारी मिळून ६९ जणांविरोधात चुकीच्या पद्धतीने कर्जवाटप आणि गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले. त्यांच्यावर १ सहस्र ४९० कोटी रुपयांचे दायित्व निश्चित करण्यात आले. संबंधित संचालक आणि अधिकारी यांची खाती गोठवण्यात आली. त्यांच्या ६५ सदनिका, १३ प्लॉट्स यांच्यावर प्रतिकात्मक जप्ती आणली आहे. त्यापैकी ९ संचालक आणि १६ अधिकारी यांच्या २३ मालमत्तांचा प्रत्यक्ष ताबा घेण्यात आला आहे. या सर्व मालमत्तांची विक्री केली तरी केवळ १०० कोटी रुपये वसूल होतील. बाकीच्या रकमेचे काय ? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.