सातारा, २५ जुलै (वार्ता.) – शहर पोलीस ठाण्यात महिला दक्षता समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला विविध क्षेत्रांत कार्यरत असणार्या महिला सहभागी झाल्या होत्या. वाढत्या अत्याचाराच्या घटना, गुन्हेगारी, फसवणूक अशा घटनांना चाप बसण्यासाठी चर्चा झाली. या वेळी महिलांच्या समस्यांचे निराकरण करणे हे सूत्र प्रकर्षाने मांडण्यात आले. यावर समुपदेशन करणे, तसेच शाळा आणि महाविद्यालय यांच्या परिसरात कायदेविषयक फलक लावणे आदी निर्णय घेण्यात आले, अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली.
जिल्ह्यात पोलीस ठाण्यांनुसार महिला दक्षता समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समित्या सक्रीय करणे आवश्यक असल्याने ही २२ जुलै या दिवशी ही बैठक घेण्यात आली. या बैठकीला अधुनिक वैद्या, महिला अधिवक्त्या, सामाजिक कार्यकर्त्या, मुख्याध्यापिका, पोलीस पाटील आदी क्षेत्रांत कार्यरत असणार्या २२ महिला उपस्थित होत्या.
या वेळी निंबाळकर म्हणाले की, मुली आणि महिला यांवरील अत्याचार नष्ट करण्यासाठी कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक असते; मात्र अन्याय झाल्यानंतर कुठे आणि कशी दाद मागायची, याचे ज्ञान नसल्यामुळे महिला अन्याय सहन करतात. पीडित महिलांना कायद्याचे ज्ञान द्यावे, त्यांना योग्य मार्गदर्शन करावे. तात्काळ साहाय्य मिळण्यासाठी ११२ या क्रमांकावर दूरभाष करावा. तसेच युवती आणि महिला यांना अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी माहिती मिळावी, यासाठी शाळा आणि महाविद्यालय यांच्या परिसरात कायदेविषयक फलक लावण्यात येणार आहेत.