७० मीटरहून अधिक उंच इमारतींमध्ये ‘फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट’ बंधनकारक ! – राज्य सरकार

मुंबई – राज्य सरकारने मुंबईसह राज्यातील उंच इमारतींमध्ये अग्नीसुरक्षेच्या दृष्टीने ‘फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट’ (आग लागल्यानंतर नागरिकांना बाहेर काढण्याचे उद्वाहन) बसवणे बंधनकारक केले आहे. अशा प्रकारचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे. राज्याच्या ऊर्जा विभागाने महानगरपालिका आणि अग्नीशमन विभाग यांच्या समन्वयाने या संदर्भात एक परिपत्रक काढले आहे. यामध्ये ७० मीटर आणि त्याहून अधिक उंचीच्या इमारतींमध्ये आता यापुढे ‘फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट’ बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

जानेवारी २०१८ पासूनच्या इमारतींना हा निर्णय बंधनकारक करण्यात आला आहे. या उद्वाहनामुळे अग्नीशमन दलाच्या जवानांना आणीबाणीच्या प्रसंगी लोकांचा जीव आणि मालमत्ता वाचवण्यासाठी पुष्कळ साहाय्य होणार आहे. या वेगवान उद्वाहनामुळे अग्नीशमन जवान त्वरित दुर्घटनाग्रस्त ठिकाणी पोचू शकतात. हे उद्वाहन आगप्रतिबंधक सामुग्रीने बनवले असल्याने ते २ घंटे आगीत तग धरून राहू शकते. तसेच त्याला ३ घंट्यांचा ‘बॅटरी बॅकअप’ही असल्याने ते तेवढा वेळ व्यवस्थित कार्यरत राहू शकते. या उद्वाहनाने १८ लोकांच्या गटाला एकाच वेळी ३ मिनिटांपेक्षा अल्प वेळेत खाली आणता येणार आहे.