कोट्यवधींचा भूखंड असलेल्या ‘वरळी सी फेस’वरील सरकारची दुग्धशाळा आरे वसाहत येथे हलवणार !

मुंबई, २१ जुलै (वार्ता.) – मुंबईतील मध्यवर्ती आणि कोट्यवधी रुपयांचा भूखंड असलेल्या ‘वरळी सी फेस’वरील सरकारची दुग्धशाळा आरे वसाहतीच्या ठिकाणी हलवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. वरळी दुग्धशाळेत होणारे दूध वितरणाचे काम २५ जुलैपासून आरे वसाहत येथून केले जाणार आहे. १४ एकरच्या या जागेचा उपयोग कोणत्या कारणासाठी करणार ? हे अद्याप सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.

आतापर्यंत या दुग्धशाळेतील बहुतांश यंत्रसामुग्री आरे वसाहत येथे हलवण्यात आली आहे. येत्या २-३ दिवसांत येथील सर्व यंत्रसामग्री आरे वसाहत येथे हलवण्यात येणार आहे. यंत्रसामग्री हलवण्यात येत असली, तरी येथील प्रशासकीय दप्तराचे कामकाज वरळी येथेच ठेवण्यात आले असून प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे कार्यालय हलवण्याविषयी अद्याप त्यांना सूचना प्राप्त झालेल्या नाहीत, अशी माहिती तेथील अधिकार्‍यांनी दिली. याविषयी माहिती देतांना एका अधिकार्‍याने मुंबईतील दुग्धशाळांमध्ये होणार्‍या दुधाचे संकलन न्यून झाल्यामुळे येथील यंत्रसाम्रगी आणि मनुष्यबळ सांभाळण्याचा आर्थिक भार पडत असल्याने प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने हे काम आरे वसाहत येथे करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे सांगितले. येथील कर्मचारी आणि अधिकारी यांची नियुक्ती कुठे करणार ? याविषयी प्रशासकीय प्रक्रिया चालू आहे.

मुंबईतील सध्याच्या भूमीच्या बाजारभावामध्ये सर्वाधिक दर असलेल्या जागेतील ‘वरळी सी फेस’ ही जागा आहे. माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या जागेवर आंतरराष्ट्रीय मत्स्यालय उभारण्याची घोषणा केली होती. राज्यात नवीन आलेले सरकार ही योजना राबवणार का ? याविषयी अद्याप स्पष्ट झालेले नाही; परंतु ‘वरळी सी फेस’ येथील कोट्यवधी रुपयांच्या या जागेवरील दुग्धशाळा हटवण्याचे काम चालू आहे.