राजभवन हे महाराष्ट्रातील जनतेसाठी नवी ऊर्जा देणारे लोकभवन ! – पंतप्रधान मोदी

मुंबई – राजभवन हे महाराष्ट्रातील जनतेसाठी नवी ऊर्जा देणारे लोकभवन आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ जून या दिवशी केले. राजभवनामध्ये क्रांतीगाथा दालनाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही उपस्थित होते.

नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की,

१. स्वातंत्र्यसमरातील विरांना ही वास्तू समर्पित करतांना मला अतिशय आनंद होत आहे. महाराष्ट्राचे हे राजभवन गेल्या दशकात अनेक लोकशाही घटनांचा साक्षीदार ठरलेले आहे. राज्यघटना आणि राष्ट्रहित यांच्या घटनांचाही साक्षीदार आहे.  क्रांतीगाथेशी जोडलेले इतिहासकार विक्रम संपत आणि त्यांच्या सहकारी यांचे मी अभिनंदन करतो.

२. श्यामजी कृष्ण वर्मा यांचे १९३० मध्ये निधन झाले. मृत्यूपूर्वी त्यांनी ‘त्यांची राख सांभाळून ठेवून भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर ती भारतात न्यावी’, अशी इच्छा व्यक्त केली होती. स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी हे काम व्हायला हवे होते; पण ते झाले नाही. वर्ष २००३ मध्ये ७३ वर्षांनंतर त्या अस्थी भारतात आणण्याचे सौभाग्य मला मिळाले.

लढून मिळवलेला इतिहास जतन करणे हे आपले काम ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना ‘क्रांतीगाथा’ या दालनाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणे हा चांगला मुहूर्त आहे. जे स्वातंत्र्य आपण उपभोगत आहोत, त्यासाठी किती जणांनी त्यांच्या घरावर निखारे ठेवले ! हे घडले नसते, तर आपण इथे येऊ शकलो असतो का ? स्वातंत्र्य कुणी आपल्याला आंदण म्हणून दिले नाही. ते लढून मिळवावे लागले. हा इतिहास जतन करणे आपले काम आहे. ज्यांनी आपल्यासाठी त्याग केला, त्या क्रांतीकारकांचे पुस्तक संकलित व्हावे; म्हणून नुसते बोलत बसण्यापेक्षा त्यांच्याप्रमाण एक कण कृती केली, तर तो त्याग आणि बलीदान कृतार्थ होईल !