नवी देहली – कोरोना महामारीच्या कालावधीत ज्या मुलांचे पालक मृत्यूमुखी पडले, त्यांना ‘पीएम् केअर्स’ या केंद्र सरकारच्या योजनेच्या अंतर्गत साहाय्य केले जाणार आहे. अनाथ झालेल्या ज्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक क्षेत्रांमध्ये शिक्षण घ्यायचे आहे, त्यांनाही साहाय्य केले जाईल. त्यांना प्रतिमाह ४ सहस्र रुपये देण्यात येणार आहेत, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. पंतप्रधान ‘पीएम्-केअर्स’ अंतर्गत मुलांसाठीच्या योजनांसंबंधीच्या एका कार्यक्रमात बोलत होते.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, कोरोना महामारीतून बाहेर पडून जगातील सर्वांत गतीने प्रगतीपथावर जाणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा क्रमांक लागतो. कोरोना महामारीच्या काळामध्ये भारताने वैज्ञानिक, डॉक्टर, तसेच युवावर्ग यांच्यावर विश्वास ठेवल्याने भारत हा जगासाठी समस्या बनला नाही, तर त्याने जगाला उपायात्मक दिशा दिली. भारतात आतापर्यंत २०० कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या असल्याचेही मोदी यांनी नमूद केले.