विनापरवाना ध्वनीक्षेपकाचा वापर केल्यास कडक कायदेशीर कारवाई ! – डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक, जळगाव

उजवीकडे प्रवीण मुंढे (छायाचित्र सौजन्य – जळगाव Live)

जळगाव – जिल्ह्यातील धार्मिक स्थळांना ध्वनीक्षेपकाच्या अनुमतीसाठी आवाहन करण्यात आलेले आहे. रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत जिल्ह्यात कुठेही ध्वनीक्षेपकाचा वापर होत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या कालावधीत कोणत्याही धार्मिक, सामाजिक, कौटुंबिक, राजकीय कार्यक्रमास अनुमती नाही. सकाळी ६ ते रात्री १० या कालावधीत ध्वनीक्षेपकाचा वापर अनुमती घेऊन आणि आवाजाची मर्यादा पाळून करता येईल. विनापरवाना जर कुणी ध्वनीक्षेपकाचा वापर करत असेल, तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी ५ मे या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.

ते पुढे म्हणाले, पोलीस नोंदीनुसार धार्मिक स्थळांना ध्वनीक्षेपकाची अनुमती देण्यात येत आहे; मात्र ती धार्मिक स्थळे अधिकृत आहेत कि अनधिकृत हे ठरवण्याचे दायित्व स्थानिक स्वराज्य संस्थांकडे म्हणजेच महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्याकडे आहे. अनुमतीसाठी पोलिसांनी केवळ ४८ ते ७२ घंट्यांची वेळ दिली आहे. (पोलिसांनी धार्मिक स्थळाला ध्वनीक्षेपक वापरण्याची अनुमती द्यायची आणि नंतर ‘ते धार्मिक स्थळ अनधिकृत आहे’, असे लक्षात आल्यास जो वाद निर्माण होईल, त्यास उत्तरदायी कोण ? त्यापेक्षा अधिकृत धार्मिक स्थळांची सूची घोषित करून त्यानंतर अनुमती देणे योग्य होईल’, हे पोलिसांच्या लक्षात येत नाही का ? – संपादक)