भाईंदरच्या जंजिरे धारावी गडदुर्गाच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन !

संवर्धनासाठी खासदार राजन विचारे यांचा पुढाकार !

भाईंदर (ठाणे) – खासदार राजन विचारे यांनी नुकतीच भाईंदरच्या पश्‍चिमेस उत्तन किनारपट्टीवरील धारावी जंजिरे गडदुर्गाची पहाणी केली. या वेळी मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले, आमदार गीता जैन, उपमहापौर प्रवीण पाटील, संबंधित अधिकारी आणि जंजिरे धारावी किल्ला जतन अन् संवर्धन समितीशी जोडलेले स्थानिक नागरिक उपस्थित होते. गडदुर्गाचे संवर्धन व्हावे, यासाठी खासदार राजन विचारे यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन गडदुर्गाच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्या वेळी ‘मुख्यमंत्र्यांनी राज्य शासनाचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले आहे. या गडदुर्गाच्या संवर्धनासाठी नियोजित आराखडा सिद्ध करण्याचे काम चालू आहे. हा गडदुर्ग समुद्राला लागून असल्याने पर्यटकांसाठी आकर्षण ठरेल’, असेही त्यांनी म्हटले.