परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आवाजातील हाक साधकांना ऐकू येणे, परात्पर गुरूंच्या आठवणीने साधकांचा भाव जागृत होणे आणि त्यामागील शास्त्र

हाक ऐकू येण्यामागील शास्त्र

‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्याच्याशी संबंधित शक्ती हे एकत्रित असतात. त्यामुळे आठवण झाली की, ‘शब्द’ आकाशतत्त्वाच्या नादस्वरूपात व्यक्त होऊन ते ऐकू येतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१८.६.२०२१)

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आवाजातील ‘तेजल’ अशी हाक ऐकू येऊन त्यांच्या आठवणीने भाव जागृत होणे

कु. तेजल पात्रीकर

‘एरव्ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र पाहून किंवा त्यांच्या समवेतचे प्रसंग आठवून माझी भावजागृती होते. पूर्वी मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे सेवेनिमित्त जाण्यास मिळायचे; पण आता त्यांची प्रत्यक्ष भेट होत नाही. त्यामुळे कधी कधी त्यांची मला पुष्कळ तीव्रतेने आठवण यायची आणि ‘आता जाऊन त्यांना भेटावे’, असे पुष्कळदा वाटायचे; परंतु ते शक्य नव्हते. माझी आणि त्यांची प्रत्यक्ष भेट झालेली नसली, तरी बर्‍याचदा त्यांनी ‘तेजल’ अशी मारलेली हाक मला ऐकू येते. त्यामुळे त्यांचे स्मरण होऊन माझी भावजागृती होते. त्या वेळी ‘माझी त्यांना भेटण्याची तळमळ देवापर्यंत पोचली असेल; म्हणून त्यांनी माझ्या नावाने मारलेली हाक मला अधूनमधून ऐकायला येऊ लागली’, असे मला वाटते. तसेच ‘ते माझ्या जवळच आहेत’, हे मला अनुभवता यावे, यासाठी देवाने ही लीला केली असावी’, असे मला वाटते.’ – कु. तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), रामनाथी आश्रम, गोवा. (१८.६.२०२१)

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आवाजातील ‘भानु’ अशी हाक ऐकू येऊन भावजागृती होणे

श्री. भानु पुराणिक

‘वर्ष २००४ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी मला हाक मारली होती. ती हाक मी आजही आठवण्याचा प्रयत्न केल्यावर मला ‘त्यांचा आवाज प्रत्यक्ष ऐकू येतो’, असे जाणवते आणि माझी पुष्कळ भावजागृती होते.’ – श्री. भानु पुराणिक (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.६.२०२१)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक