‘गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् ।’, या वाक्याची क्षणोक्षणी अनुभूती देऊन आनंददायी आणि अमृतदायी करणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

आमचे वडील विजय डगवार यांच्या अचानक झालेल्या निधनानंतर काही महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करतांना आलेल्या गुरुकृपेच्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

कै. विजय डगवार

१. जीवनातील अत्यंत दुःखद वाटणार्‍या प्रसंगामध्ये स्थिर रहाता येणे

‘१४.६.२०२१ या दिवशी सकाळी माझे वडील श्री. विजय डगवार यांचे तीव्र हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. या वेळी ‘केवळ गुरुकृपेमुळे जीवनातील अत्यंत दुःखद वाटणार्‍या प्रसंगाकडे आपण साक्षीभावाने पाहून स्थिर आणि आनंदी राहू शकतो’, हे आम्हाला अनुभवता आले.

२. वडिलांचे निधन झाल्याचे ठाऊक नसणे; मात्र भ्रमणभाषवरील नातेवाइकांच्या ‘श्रद्धांजली’ अशा आलेल्या लघुसंदेशामुळे निधन झाल्याचे कळून धक्का बसणे

आम्हाला ‘बाबांचे निधन झाले आहे’, हे ठाऊक नव्हते. नातेवाइकांनी आम्हाला ‘प्रकृती चिंताजनक आहे. आलात, तर बरे होईल’, असे कळवले होते. त्या वेळी कोरोनामुळे दळणवळण बंदी होती. अशा स्थितीत केवळ तीस मिनिटांमध्ये आम्ही विमानाचे तिकीट काढून आश्रमातून निघालो. आम्ही विमानतळावर पोचत असतांनाच एका नातेवाइकांचा ‘व्हॉट्सॲप’वर ‘बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली’, असा संदेश आल्यावर आम्हाला बाबांचे निधन झाल्याचे कळले. आमच्यासाठी ही बातमी धक्कादायक होती.

३. गुरुकृपा आणि सद्गुरूंचे नामजपादी उपाय यांमुळे स्थिर रहाता येणे

निघण्यापूर्वी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याशी थोडा वेळ बोलणे झाले. सद्गुरु (डॉ.) मुकुल माधव गाडगीळ यांचे नामजपादी उपाय, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे सूक्ष्मातील असलेले संरक्षणकवच आणि गुरुकृपा यांमुळे आम्ही अशा स्थितीत शांत अन् स्थिर राहू शकलो.

४. आईने वडिलांच्या मृत्यूनंतरचे सर्व विधी शास्त्रानुसार आणि भावपूर्ण करणे, तसेच उपस्थित लोकांना त्यातील वेगळेपणा जाणवणे

श्रीमती मंदाकिनी डगवार

आम्ही पोचेपर्यंत आईने (श्रीमती मंदाकिनी डगवार (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के)) ‘सर्व विधी शास्त्रानुसार कसे करू शकतो ?’, या दृष्टीने प्रयत्न केले. सर्व विधी तिने स्वतः समजून घेऊन भावपूर्ण केले. हे सर्व विधी होत असतांना उपस्थित लोकांनी सांगितले, ‘‘मृत्यूचा असा शांतपणे केलेला विधी कधी पाहिला नव्हता. हा विधी मृत्यू झालेल्या व्यक्तीचा नसून तो ‘उच्च आत्म्याचा सोहळा आहे’, असे वाटत आहे.’’ उपस्थित असलेल्या समाजातील व्यक्तीही नामजप वैखरीतून करत होत्या. हे सर्वच विधी केवळ परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने शांतपणे आणि भावपूर्ण झाले.

बाबांच्या निधनानंतर साधकांनी पुष्कळ साहाय्य केले. हे सर्व पाहून नातेवाइकांनाही सनातन संस्थेच्या साधकांचे पुष्कळ कौतुक वाटले आणि ते सकारात्मक झाले.

५. आईच्या साधनेची वाटचाल संतत्वाच्या दिशेने झाली असल्याचे जाणवणे

आईची स्थिरता आणि तिच्या साधनेचा परिणाम यांमुळे आम्ही भावनिक झालो नाही. ‘आईच्या साधनेची वाटचाल संतत्वाच्या दिशेने झाली आहे’, असे जाणवते. इतका दुःखद प्रसंग होऊनही बाबा गेल्यावर आईचा ‘कामे लवकर पूर्ण झाल्यास आम्हाला लवकर आश्रमात जाता येईल’, असा विचार होता.

श्री. अमित विजय डगवार

६. बाबांच्या अचानक झालेल्या निधनानंतर अधिकोष (बँक) आणि शेत-जमीन इत्यादींची सर्व कामे करतांना अनुभवलेली गुरुकृपा !

घरातील सगळे व्यवहार बाबा पहायचे. त्यामुळे आम्हाला व्यावहारिक कामाचा काहीच अनुभव नव्हता. बाबांचे अचानक निधन झाल्यामुळे अधिकोष (बँक) आणि शेत-जमीन इत्यादी सर्व कामे करायची होती. अचानक असे घडल्याने ‘सर्व कसे करायचे ?’, हेही आम्हाला कळत नव्हते. त्या वेळी परात्पर गुरुमाऊलीने नातेवाईक आणि साधक यांच्या माध्यमातून साहाय्य केले अन् दिशा दिली. मृत्यूचा दाखला सिद्ध केल्यानंतर जमीन आणि अधिकोष या संदर्भातील सर्व कामे केवळ आणि केवळ गुरुकृपेने लवकर पार पडली.

७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पुरुषांना अहंकार असल्यामुळे ते पत्नीच्या साधनेला विरोध करत असल्याचे आणि याची काळजी न करण्याविषयी आईला सांगणे

वर्ष २००० मध्ये आईला परात्पर गुरुदेवांचा सत्संग लाभला. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी विचारले, ‘‘विरोध कुणाला आहे ?’’ तेव्हा आईने सत्संगात हात वर केला होता. त्या संदर्भात परात्पर गुरु डॉक्टर आईला म्हणाले, ‘‘पुरुषांना अहंकार असतो. त्यामुळे ते विरोध करतात. काळजी नका करू.’’ परात्पर गुरु डॉक्टरांच्या या भेटीनंतर बाबांचा साधनेला असलेला विरोध काही प्रमाणात अल्प झाला होता.

८. विरोध करणार्‍या बाबांना एक चांगला साधक या टप्प्यापर्यंत आणून त्यांची आईच्या माध्यमातून प्रगती करवून घेणारे एकमेवाद्वितीय परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

‘बाबांना होत असलेले आध्यात्मिक त्रास आणि अपेक्षा यांमुळे ते साधनेला विरोध करतात’, असे आईच्या लक्षात आले. त्यानंतर तिने त्यांना आध्यात्मिक उपाय आणि नामजपाचे थोडे-थोडे महत्त्व सांगून त्यांच्याकडूनही नामजपादी उपाय करवून घेण्यास प्रारंभ केला. तसेच ‘त्यांच्या कोणकोणत्या अपेक्षा असतात ?’, हे जाणून त्याचा सेवा आणि साधना यांवर परिणाम होऊ न देता त्यातून मार्ग काढला, उदा. आई सेवेला गेल्यावर बाबा घरी एकटे असतांना मध्ये मध्ये त्यांना दूरभाष करणे, नामजप आणि नामजपादी उपायांची आठवण करून देणे, ‘ते जेवले का ?’, हे विचारणे, सत्संगातून घरी येण्यास विलंब होणार असल्यास तसे त्यांना अडचण सांगून विचारून घेणे इत्यादी प्रयत्न केले. त्यामुळे बाबांमध्ये सकारात्मक पालट होत गेले.

९. आईची साधनेची तीव्र तळमळ आणि परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा यांमुळे बाबांमध्ये झालेले पालट

अ. बाबा नियमितपणे व्यष्टी आढावा देऊ लागले. त्यांचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न नियमितपणे होत असत.

आ. आश्रमात राहून साधना करण्यासाठी ते सिद्ध झाले होते.

इ. काही दिवस आश्रमात वास्तव्यास आलेले असतांना त्यांच्या पायाला अस्थिभंग झाला होता. त्याही परिस्थितीमध्ये त्यांनी नियमित सेवा केली.

१०. अधिकोषातील एका कामाच्या संदर्भात अडचणी येऊन त्यांसाठी ६ मास ते एक वर्षही लागू शकणार असणे

बाबांचे अचानक निधन झाल्यामुळे अधिकोषाच्या ठेवीतील पैसे मिळण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून आम्ही ते काम पूर्ण करण्यास दिले. या सर्व कामांना तीन मास उलटूनही अधिकोषाकडून ‘अजून वेळ लागेल’, असे उत्तर येत होते. अधिकोषातील कामे लवकर होत नसल्यामुळे आम्हाला रामनाथी आश्रमात परत जायला अडचण येत होती. त्यानंतर आम्हाला एका साधकाच्या माध्यमातून अधिकोषातील कामांच्या अडचणींविषयी योग्य माहिती मिळाली. तसेच ‘कार्यालयातील कामांसाठी अधिक कागदपत्रांची आवश्यकता भासणार आहे आणि ते कागदपत्र मिळण्यासाठी ६ मास ते एक वर्षही लागू शकते अन् खर्चही पुष्कळ येऊ शकतो’, असे आम्हाला कळले. या सर्व प्रक्रियेमुळे ‘साधनेतील अमूल्य वेळ वाया जाईल का ?’, असे आम्हाला वाटत होते.

११. ‘अशक्यही शक्य करतील स्वामी !’, याची प्रचीती येणे

संतांनी सांगितलेले नामजपादी उपाय आणि परात्पर गुरुदेवांची कृपा यांमुळे अधिकोषाचे काम काही दिवसांतच पूर्ण झाले. यावरून परात्पर गुरुमाऊलीने ‘अशक्यही शक्य करतील स्वामी !’, याची प्रचीती आम्हाला दिली. ही सर्व कामे करत असतांना आम्हाला सतत परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवायला मिळत होते. ‘त्यांच्या कृपेमुळे या कामातील सर्व अडथळे दूर होत होते’, हे आम्हाला क्षणोक्षणी अनुभवायला मिळाले.’

– श्री. अमित विजय डगवार आणि कु. मयुरी विजय डगवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१०.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक