रामलीलेमध्ये पुत्रवियोगाच्या प्रसंगात राजा दशरथाचा अभिनय करणार्‍याने प्रत्यक्षात सोडले प्राण !

रामलीलेमध्ये राजा दशरथाचा अभिनय करणारे राजेंद्र सिंह

बिजनौर (उत्तरप्रदेश) – रामायणामध्ये जसा पुत्रवियोगाच्या वेळी व्याकूळ झालेले राजा दशरथ त्यांचे प्राण सोडतात, तसाच प्रकार येथील रामलीलेच्या सादरीकरणामध्ये घडला. येथील हसनपूरमध्ये रामलीला चालू असतांना पुत्रवियोगाच्या प्रसंगाच्या वेळी राजा दशरथाचा अभिनय करणारे राजेंद्र सिंह यांनी प्रत्यक्षातच प्राणत्याग केल्याची घटना घडली. प्रथम काही वेळ ‘त्यांनी खरोखर प्राणत्याग केला आहे’, हे समजले नाही. प्रसंग संपल्यानंतर सहकार्‍यांनी राजेंद्र सिंह यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. गेल्या २० वर्षांहून ते ही भूमिका निभावत होते.