गोव्यातील कलम १४४ मागे घेतले असून कोरोना महामारीशी संबंधित विशेष मार्गदर्शक तत्त्वे लागू आहेत ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

पणजी, २५ सप्टेंबर (वार्ता.) – राज्यात लागू झालेले कलम १४४ (जमावबंदी आदेश) २० सप्टेंबरपासून मागे घेण्यात आला आहे, तर कोरोना महामारीशी संबंधित विशेष मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली आहेत, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.
राज्यात कॅसिनो, स्पा आदी व्यवसाय २० सप्टेंबरपासून निम्म्या क्षमतेने चालू करण्यात आले आहेत; मात्र १४४ कलम हटवल्याविषयीची माहिती देणारे परिपत्रक काढले गेले नसल्याने धार्मिक स्थळांचे व्यवस्थापन आणि उपाहारगृहांचे मालक यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे स्पष्टीकरण दिले. ते पुढे म्हणाले, ‘‘शासनाने १८ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात १४४ कलम हटवल्याचा उल्लेख आहे. राज्यातील धार्मिक स्थळे चालू करण्यासंबंधीची सूचना यापूर्वीच देण्यात आली आहे. राज्यात कोरोना महामारीशी संबंधित विशेष मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली आहेत.’’