पुणे, ४ सप्टेंबर – कृष्ण यजुर्वेदाच्या तैतिरीय संहितेचे संपादन करणारे ज्येष्ठ संस्कृत तज्ञ आणि वैदिक संशोधन मंडळाचे माजी सचिव डॉ. त्रिविक्रम नारायण उपाख्य त्रि.ना. धर्माधिकारी यांचे वृद्धापकाळाने ३ सप्टेंबर या दिवशी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा, २ मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. लालबहादूर शास्त्री केंद्रीय विद्यापिठाने त्यांना सन्माननीय डी.लिट. प्रदान केली होती.
संस्कृत भाषेच्या अध्ययनाचा प्रारंभ त्यांनी त्यांच्या वडिलांकडे केला. पुण्यातील वैदिक संशोधन मंडळ या संस्थेतून धर्माधिकारी यांची संशोधक म्हणून कारकीर्द चालू झाली. वर्ष १९५७ ते वर्ष १९९३ अशी ३६ वर्षे ते संशोधक आणि संपादक म्हणून कार्यरत होते. प्राच्यविद्या क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल धर्माधिकारी यांना राष्ट्रपती पुरस्कार, शृंगेरी शारदापिठाचा पुरस्कार, वेदरत्न पुरस्कार, श्रीमंत नानासाहेब पेशवे पुरस्कार आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.