श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने

श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

१. ‘काळाला संपूर्ण श्रद्धेने सामोरे जाणे’ ही साधकांची साधना आहे !

‘बर्‍याच साधकांना या आपत्काळात साधना करतांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. पूर्वी ऋषिमुनी आणि संत यांनी ईश्‍वरप्राप्तीसाठी अपार कष्ट सोसले आहेत. सनातनच्या प्रत्येक साधकाचा देह यज्ञकुंडासमान झाला आहे. तीव्र त्रासामध्ये डगमगून न जाता साधक त्याच्या प्रत्येक प्रयत्नाची आहुती या धर्मयज्ञात आनंदाने देत आहेत. आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो. ‘त्याला संपूर्ण श्रद्धेने सामोरे जाणे’ ही साधकांची साधना आहे. हा काळही निघून जाईल आणि गुरुकृपेने चांगला काळ येईल. तोपर्यंत साधकांनी त्यांना सांगितलेले वैद्यकीय उपचार आणि संतांनी सांगितलेले नामजपादी उपाय नियमित करावेत.

२. देह असेल, तरच आपण साधना करू शकतो. त्यामुळे स्वतःचे स्वास्थ्य उत्तम रहाण्यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रयत्न करावेत. हे सर्व प्रयत्न साधना म्हणून केले, तर त्यांचा कंटाळा येणार नाही.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्‍या साधकांनी रामराज्यासाठी भोगलेल्या प्रत्येक त्रासदायक क्षणाची नोंद स्वतः श्रीविष्णूने त्याच्या विष्णुमंडलात करवून घेतली आहे !

४. राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी साधकांनी केलेल्या त्यागामुळे येणार्‍या पिढ्यांना एक सुंदर ईश्‍वराधिष्ठित, आनंदी आणि आध्यात्मिक साम्राज्य मिळणार आहे !

आज साधक समष्टी हितासाठी त्रास भोगत आहेत. त्यामुळे येणार्‍या पिढ्यांना एक सुंदर ईश्‍वराधिष्ठित, आनंदी आणि आध्यात्मिक साम्राज्य मिळणार आहे. याची प्रत्येक साधकाने नोंद घ्यावी. भगीरथाने सहस्रो वर्षे तपस्या करून अपार कष्ट घेतल्यामुळे गंगा पृथ्वीवर अवतरित झाली. आज त्या गंगेच्या कृपेने अनेकांचे जीवन पावन आणि समृद्ध झाले आहे, तसेच साधकांनी घेतलेल्या अपार कष्टाने आणि श्री गुरूंच्या संकल्पाने पृथ्वीवर रामराज्य येईल. राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी साधकांनी केलेला सर्वस्वाचा त्याग भगवंत व्यर्थ जाऊ देणार नाही. हा त्याग पुढे कित्येक पिढ्यांच्या लक्षात राहील. भगवंतालाही याचे स्मरण राहील.’

– श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ (२८.४.२०२०)