परात्पर गुरु डॉक्टरांच्या ‘श्रीविष्णुतत्त्व जागृती’ सोहळ्यामध्ये मथुरा आणि फरीदाबाद येथील साधकांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. कार्यक्रमापूर्वी स्वप्नात परात्पर गुरु साधिकेच्या शंकांचे निरसन करण्यासाठी तिच्याकडे येणे आणि स्वप्नात पाहिल्याप्रमाणे प्रत्यक्षात कार्यक्रम असल्याचे लक्षात येणे

‘११.१२.२०१९ या दिवशी पहाटे  साधारण ४ वाजता मला स्वप्न पडले होते. स्वप्नामध्ये मला पुढील दृश्य दिसले, ‘पुष्कळ मोठे सभागृह आहे. त्यामध्ये पुष्कळ साधक सेवा करत आहेत. एका साधिकेने मला म्हटले, ‘काकू, तुम्ही परात्पर गुरुदेवांना बोलावलेत; म्हणून परात्पर गुरुदेव आले आहेत. ते तुमच्याच वाहनाने आले आहेत.’ मी परात्पर गुरुदेवांजवळ कृतज्ञताभावाने गेले. परात्पर गुरुदेव पुष्कळ अशक्त वाटत होते. ते माझ्याकडे पहात होते. मी त्यांना विचारले, ‘मी महाप्रसाद बनवत आहे. तुमच्यासाठी काय बनवू ?’ त्यांनी मला विचारले, ‘तुम्ही स्वयंपाकात काय बनवणार आहात ? मी केवळ वरण-भातच खातो. तुम्ही माझ्यासाठी वरण-भातच बनवा.’ नंतर कु. तेजल पात्रीकरताई तेथे होत्या. त्यांनी मला सांगितले, ‘तुम्हाला काहीतरी विचारायचे होते; म्हणून परात्पर गुरुदेव स्वतःहून तुमच्याकडे आले आहेत.’ त्यानंतर मी त्यांच्यासाठी महाप्रसाद बनवण्यासाठी स्वयंपाकघरात आले.’ नंतर मला जाग आली. तेव्हा माझा नामजप होत होता. मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.

जेव्हा आजचा कार्यक्रम पाहिला, तेव्हा मी स्वप्नामध्ये पाहिली तशीच स्थिती मला कार्यक्रमामध्ये जाणवली. आजच्या कार्यक्रमामध्ये परात्पर गुरुदेव ज्या आसंदीवर बसले होते, त्याच प्रकारच्या आसंदीवर ते माझ्या स्वप्नात बसले होते.’

– श्रीमती पुष्पा वर्मा, मथुरा

२. नेहमीपेक्षा खोली सुंदर दिसून सात्त्विकता जाणवणे

‘सत्संग चालू होतांना खोलीच्या दिशेने पाहिल्यावर मनामध्ये विचार आला, ‘या खोलीमध्ये मी प्रतिदिन बसते; पण आज खोली पुष्कळ सुंदर वाटून मला सात्त्विकता आणि हलकेपणा जाणवला.’ – श्रीमती अर्चना सेठ, गुरुग्राम

३. ‘कार्यक्रमाच्या वेळी परात्पर गुरुदेवांच्या ब्रह्मरंध्रामध्ये पुष्कळ हालचाल होत होती. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण नेहमी हसत असतो, तसेच परापर गुरुदेव हसत होते. परात्पर गुरुदेव सर्व साधकांना पुष्कळ शक्ती देत होते. संपूर्ण कार्यक्रमामध्ये कृतज्ञता वाटत होती.’ – श्री. प्रताप सिंह वर्मा, मथुरा

४. ‘आजच्या कार्यक्रमाला आरंभ झाला. तेव्हा मन निर्विचार अवस्थेत जाऊन ध्यान लागल्यासारखे झाले. परात्पर गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यास सांगितले गेले. तेव्हा डोळे बंद केल्यावर मला परात्पर गुरुदेवांच्या ठिकाणी दिव्यासारखी ज्योत दिसली.’ – श्री. विनय वर्मा, मथुरा (६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विनय वर्मा यांचे १४ जुलै २०२० या दिवशी देहावसान झाले.)

५. चैतन्य आणि आनंद यांची अनुभूती येणे

‘आज सकाळपासून पुष्कळ आनंद वाटत होता. घरामध्ये सगळीकडे चैतन्य जाणवत होते. सर्व सेवा आनंदाने, भावपूर्ण आणि समयमर्यादेत पूर्ण झाल्या. पुष्कळ उत्साह जाणवत होता. आजच्या कार्यक्रमात पुष्कळ चैतन्य, आनंद आणि शांती जाणवत होती. पुष्कळ मोठे ब्रह्मांड असून शून्यामध्ये केवळ गुरुदेवांचा तोंडवळा दिसत होता. ‘आपण खोलीमध्ये नसून ब्रह्मांडामध्ये आहोत’, असे मला वाटत होते. नृत्य साधनेच्या वेळी पूर्ण शरिरावर रोमांच उमटत होते. प्रत्येक मुद्रेने भाव जागृत होत होता आणि पुष्कळ आनंद वाटत होता.’ – श्रीमती सुमन जादौन, मथुरा

६. ‘सोेहळ्यामध्ये आनंदाची अनुभूती येत होती. साधकांनी सादर केलेले गायन, वादन आणि नृत्य पाहून माझा भाव जागृत होत होता. सतारवादनाच्या वेळी ‘मीच सतार वाजवत आहे’, असे मला वाटत होते. गुरुदेवांजवळ पांढरा आणि पिवळा प्रकाश दिसत होता.’ – श्रीमती विमल धमीजा, मथुरा

७. वैकुंठात असल्याचे जाणवून विष्णुतत्त्व ग्रहण होत असल्याचे अनुभवणे

‘आज सोहळ्यामध्ये पूर्ण शांती आणि आनंद यांचा अनुभव येत होता. सोहळ्यामध्ये माझी सतत प्रार्थना, कृतज्ञता आणि नामजपही झाला. श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरुदेवांचे विष्णुतत्त्व मला ग्रहण होत होते. गुरुदेव मधे मधे मंद आणि मधुर हास्य करत होते. त्या वेळी मला श्रीकृष्णाच्या नटखट स्वभावाची अनुभूती आली. आम्ही बसलेल्या खोलीमध्ये ‘आम्ही सर्व साधक वैकुंठात आहोत. निरंतर गुरुदेवांकडून चैतन्य, ज्ञान आणि शक्तीच्या लहरी प्राप्त होत आहेत. पूर्ण शरीर, मन आणि बुद्धी यांची शुद्धी होत आहे’, अशी मला अनुभूती आली.’- कु. स्वाती, मथुरा

८. ‘सत्संगामध्ये येऊन पुष्कळ चांगले वाटले. थोड्या वेळानंतर झोप येत असल्यासारखे वाटले. नामजपादी उपाय केल्यानंतर झोप येणे बंद झाले. त्यानंतर पुष्कळ चांगले वाटले. पुनःपुन्हा शरिरामध्ये कंपने येऊन पुष्कळ सुगंधही येत होता. भावजागृती होऊन माझ्या डोेळ्यांतून पाणी येत होते. ‘माझ्या चहुबाजूंनी संतच बसले आहेत’, असे मला वाटले.’ – श्रीमती साधना भाटिया, मथुरा

९. बासरीतून ‘ॐ नमो नारायण ।’ हा नामजप येत असल्याचे जाणवून स्वतःचाही हा नामजप चालू होणे

‘बासरीवादन केल्यानंतर बासरीतून ‘ॐ नमो नारायण ।’ हा नामजप बाहेर पडत होता आणि बासरीच्या नादावर माझासुद्धा हा नामजप होत होता. बासरीवादन संपल्यानंतर सूत्रसंचालन करणार्‍या श्री. विनायक शानभाग यांनी सांगितले, ‘‘बासरीवर नारायणाच्या स्तुतीचा नाद वाजवला जात होता.’’ मला ठाऊक नव्हते की, ते बासरीवर कोणते गीत वाजवत आहेत ? माझ्या मनाला एक वेगळ्याच प्रकारच्या शांतीची अनुभूती येत होती. माझ्याकडून वारंवार कृतज्ञता व्यक्त होत होती.’ – श्री विनय वर्मा, मथुरा

१०. ‘सोहळा पहातांना माझे सहस्रारचक्र जागृत असल्याची अनुभूती आली. त्यानंतर ध्यानावस्था अनुभवता येऊन ती पुष्कळ वेळपर्यंत टिकून होती. माझे मन पुष्कळ आनंदी होते. आरतीच्या वेळीही माझा भाव जागृत झाला. ‘मला या कार्यक्रमाला येता आले’, हीसुद्धा अनुभूती आहे. कार्यालयातून येण्याची निश्‍चिती नव्हती; परंतु तरीही येथे पोचू शकलो. हे केवळ गुरुकृपेने शक्य झाले.’ – श्री. गुलशन किंगर, फरीदाबाद

११. ‘कु. शर्वरी कानस्कर नृत्य करत होती, तेव्हा ‘मीच गुरुदेवांच्या समोर नृत्य करत आहे’, असे मला वाटत होते. त्या वेळी माझे शरीर हलके झाल्याचे जाणवले. आरतीच्या वेळी मला माझे स्वभावदोष आणि अहं आठवले. त्यानंतर मी परात्पर गुरुदेवांना अंतर्मनातून प्रार्थना केली, ‘गुरुदेवा, आपणच हे सर्व दूर करू शकता. तुम्हीच आम्हाला दर्शन देत रहा आणि आम्हाला साधनेसाठी शक्ती द्या.’ – श्रीमती ममता किंगर, फरीदाबाद

१२. ‘कु. शर्वरी कानस्कर नृत्य करत असतांना ‘आम्ही वैकुंठलोकामध्येच बसलो आहोत’, असे जाणवत होते. श्री गुरुचरणांवर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी फूल अर्पण करून गुरुचरणांजवळ बसल्यावर श्रीचित्शक्ति सौ. अंजली गाडगीळ यांच्या नाकाजवळ मला पिवळा प्रकाश दिसला.’ – श्रीमती सीमा शर्मा, फरीदाबाद

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक