इयत्ता ९ वी आणि ११ वी च्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय !

इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षा मात्र ‘ऑफलाईन’च होणार

मुंबई – कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन इयत्ता १ ली ते ८ वी च्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याच्या निर्णयानंतर आता इयत्ता ९ वी आणि ११ वी च्या विद्यार्थ्यांनाही सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. इयत्ता १० वी आणि १२ वी च्या परीक्षा मात्र ‘ऑफलाईन’च (परीक्षा केंद्रात प्रत्यक्ष जाऊन परीक्षा देणे) घेण्यात येणार आहेत. येत्या २ दिवसांत याविषयी मुख्यमंत्र्यांशी भेटून परीक्षेचे वेळापत्रक निश्‍चित केले जाणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

कोरोनामुळे या वर्षी इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्या; मात्र बहुतेक ठिकाणी प्रात्यक्षिके, सत्र परीक्षा, चाचणी परीक्षा झाल्या नाहीत. इयत्ता ११ वीचे वर्गही नोव्हेंबर मासात चालू झाले. त्यामुळे ‘विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करायचे ?’, असा प्रश्‍न शिक्षण विभागापुढे होता. इयत्ता १० वी आणि १२ वी च्या परीक्षाही पुढे ढकलण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत आहे; मात्र या परीक्षा नियोजित वेळेत घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.