जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्याकडील कार्यभार काढून घेतला

महिला कर्मचार्‍याचा विनयभंग केल्याचा आरोप

सिंधुदुर्ग- जिल्हा रुग्णालयातील एका महिला कर्मचार्‍याचा विनयभंग केल्याचा आरोप असलेले जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्याकडील पदभार काढून घेण्यात आला आहे. हा पदभार अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्यावर ओरोस पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्जही फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे सध्याच्या कोरोनाच्या काळात तातडीने त्यांच्याकडील पदभार काढून घेऊन तो अन्य वैद्यकीय अधिकार्‍यांकडे देण्यात यावा, याकडे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आरोग्य उपसंचालक, कोल्हापूर यांचे ४ मार्चला पत्राद्वारे लक्ष वेधले होते. या पत्राची नोंद घेत आरोग्य उपसंचालक यांनी डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्याकडून सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा पदभार काढून घेतला.